शिवसेना नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का देत शिंदे गटाने विधीमंडळातील शिवसेना कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत, अनेक आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, यावर आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्याचा निर्णय योग्यच येईल अशी आम्ही आशा करतो, असे वक्तव्य ठाकरे यांनी केले आहे. तसेच, हे देशात जे काही सुरु आहे ते वेळीच थांबवले नाही तर 2024 ला हुकूमशाही येईल, असे वक्तव्यदेखील उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
( हेही वाचा: ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले; याचिका तातडीने दाखल करुन घेण्यास नकार )
शिवसेना नाव चोरले ठाकरे नाव चोरू शकत नाहीत
माझे नाव आणि पक्षाचे चिन्हही चोरले आहे. चोराला राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरु झाला आहे. त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरलेले आहे. हा पूर्वनियोजित कट होता. त्यांनी शिवसेना नाव चोरले तरी ठाकरे नाव चोरु शकत नाही. बाळासाहेबांच्या आणि मासाहेबांच्या पोटी जन्माला येण्याचे भाग्य त्यांना दिल्लीवाले देऊ शकत नाही. आज जी परिस्थिती शिवसेनेवर आली आहे, ती देशातल्या कोणत्याही पक्षावर आणू शकतात. आताचा याचा मुकाबला केला नाही तर 2024 ची लोकसभेची निवडणूक देशातील शेवटची निवडणूक ठरु शकेल. कारण, त्यांच्यावर हुकूमशाहीचा नंगानाच सुरु होऊ शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community