केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला दिल्यापासून राजकीय वर्तुळातील समीकरण बदलून गेली आहेत. यानंतर आता येत्या २७ फेब्रुवारीपासून शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तसंच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री शिंदे सर्व शिवसेना आमदारांना व्हीप बजावणार का? यावर चर्चा सुरू आहे. तसंच ठाकरे गटाच्या आमदारांकडून हा व्हीप स्वीकारणार नसल्याची प्रतिक्रिया आली आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी व्हीप न पाळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार असं स्पष्टच सांगितलं आहे.
प्रसार माध्यमांसोबत बोलताना भरत गोगावले म्हणाले की, ‘केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाच्या अनुषंगानं आम्ही शिवसेना पक्षाचं विधिमंडळाचं जे कार्यालय होत, त्याच्यामध्ये सोमवारी प्रवेश केला. येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात काही रणनिती राखायची असते, त्याच्यावरती सोमवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली.’
व्हीपबाबत काय म्हणाले गोगावले?
‘व्हीप अजून काढला नाही, पण तो नियमाप्रमाणे काढावा लागतो, तो आम्ही काढू. हा व्हीप सगळ्यांना लागू होतो. कारण ज्या पक्षाच्या अधिपत्याखाली येतात, त्या सगळ्यांना आम्ही व्हीप बजावत असतो आणि तो त्यांनी स्वीकारायचा असतो. त्यामुळे तो ते स्वीकारतील. व्हीप जर स्वीकारला नाही, तर रितसर कारवाई करण्याचे नियम आहेत, पुढे त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू,’ असं गोगावले यांनी सांगितलं.
(हेही वाचा – फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी पहाटे नाही तर ‘या’वेळेत झाला; भगतसिंह कोश्यारींनी स्पष्टच सांगितलं…)
ठाकरे गटाच्या व्हीप न स्वीकारणाऱ्या प्रतिक्रियेवर गोगावले म्हणाले….
‘व्हीप आम्हाला लागू होऊ शकतं नाही, आम्ही तो स्वीकारणार नाही,’ ठाकरे गटाच्या आमदारांच्या प्रतिक्रियेवर गोगावले म्हणाले की, ‘ठीक आहे. आम्ही कुठे सांगितलंय, लागू कराच आणि घ्यायचा म्हणून. ते त्यांच्या मनावरती आहे. आमचं कर्तव्य आम्ही करू. त्यांनी त्यांचं कर्तव्य करा. जे काय असेल ते दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल.’
Join Our WhatsApp Community