वैदिक आर्य संस्कृतीची माय भू हिंदुस्थान!

179

ब्रिटानिका एनसायक्लोपीडिया या प्रमाणभूत ग्रंथात आर्यांनी हिंदुस्तानवर आक्रमण केले तेव्हापासून हिंदुस्तानच्या प्राचीन इतिहासाला आरंभ झाला, असे नमूद करण्यात आले आहे. यावर विश्वास ठेवून किंवा याचा संदर्भ देऊन आर्य बाहेरून म्हणजे मध्य आशियातून हिंदुस्तानात आले असे पिढ्यान पिढ्या शिकवले गेले.

वास्तविक ऋग्वेद हा या विश्वातला प्राचीनतम ग्रंथ असून तो संस्कृत भाषेत आहे.‌ संस्कृत हीच भाषा सर्व भाषांची जननी आहे. या संस्कृत भाषेचा प्रचार गंगा आणि सिंधूच्या प्रदेशातून विश्वात सर्वत्र झाला, हे सत्य आहे. त्याचा स्वीकार जागतिक स्तरावरच्या विद्वानांनी केला होता. याला वर्ष १७८० पर्यंत कोणीही विरोध केला नव्हता. यानंतर मात्र एका षडयंत्राद्वारे आर्य बाहेरून हिंदुस्थानात आले हा सिद्धांत मांडला गेला आणि तोच जगाच्या मन-मस्तिष्कावर ठसवला गेला.

सर विल्यम जोन्स यांनी १७८६ मध्ये एका भाषणात म्हटले की संस्कृत भाषा आणि इतर युरोपीय भाषा यांच्यामध्ये साधर्म्य आढळून येते. या सर्व भाषा कोणत्यातरी एका मूळ भाषेतून निर्माण झाल्या असल्या पाहिजेत. अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या भाषणामुळे एक कपोल कल्पित कथा रचण्यात आली. ती म्हणजे प्रोटो-इंडो-युरोपियन (आद्य युरोपीय) नावाची एक अज्ञात भाषा, हीच भाषा जगातल्या संपूर्ण भाषांची जननी आहे असे घोषित करण्यात आले. हे घोषित करणाऱ्यांनी संस्कृत भाषेला इंडो आर्यन भाषा असे नाव दिले. एवढ्यावर ही गोष्ट थांबली नाही. या मंडळींनी इंडो आर्यन म्हणजेच संस्कृत भाषेला इंडो युरोपियन भाषेची शाखा असलेल्या इंडोइराणियन भाषेची उपशाखा आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. हे सिद्ध करताना दोन्ही भाषांमध्ये असलेल्या काही सामायिक शब्दांचे दाखले देण्यात आले. अशा प्रकारे आर्य शब्दाशी मिळणारे काही शब्द इतर भाषांमध्ये आढळून आले. त्यामुळे ती मूळ भाषा आणि ते बोलणारे लोक यांना आर्यन असे म्हटले जाऊ लागले. हे करताना सर्व भाषांची जननी असलेल्या आणि ती भाषा बोलणाऱ्या समाजाचे मूळ स्थान हिंदुस्थान बाहेर आहे असे कल्पनेचा आधार घेऊन ठरवण्यात आले. या काल्पनिक पायावर आधारित पुढे आर्यांनी हिंदुस्थानवर आक्रमण केले असा सिद्धांत जगापुढे मांडला गेला. त्याचबरोबर त्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यात आला.

काही लबाड माणसांनी कटकारस्थान करून मांडलेला हा सिद्धांत कसा चुकीचा आहे हे काही विद्वानांनी सिद्ध करण्यासाठी पुढाकार घेतला. सरस्वती आणि सिंधूच्या काठावर राहणारे लोक तांबे आणि कांस्य या दोन्ही धातूंच्या उपकरणांची निर्मिती करत होते. तांबे मुबलक प्रमाणात उपलब्ध होते त्यामुळे तांब्याची उपकरणे मोठ्या प्रमाणात निर्माण केली जात होती. कांस्य धातू निर्माण करण्यासाठी तांबे आणि टिन (जस्त) या धातूचे मिश्रण करावे लागते. टिन हा धातू त्यांच्यासाठी मौल्यवान असल्यामुळे तो खुरासान तसेच बुखारा आणि समरकंदच्या मध्यवर्ती प्रदेशातून आणावा लागत होता. सरस्वती आणि सिंधू संस्कृतीचे पतन झाल्यानंतर साधारणपणे एक सहस्त्र वर्षापेक्षा अधिक काळपर्यंत तांब्याच्या वस्तू निर्माण केल्या जात होत्या. टिन धातूचा उपयोग करून कांस्य धातूची निर्मिती करण्याचे काम बंद पडले होते. कारण बलुचिस्तान आणि उत्तर अफगाणिस्तान या प्रदेशाशी असलेला संबंध तुटला होता परिणामी तिथून कांस्य धातू तयार करण्यासाठी लागणारा टिन धातू आणला जात नव्हता. जर आर्य बाहेरून हिंदुस्थानात आले असते तर येताना त्यांनी आपल्याबरोबर टिन धातू का आणला नाही? असा प्रश्न अमेरिकेतील पुरातत्त्वज्ञ जे एम केनॉयर यांनी उपस्थित केला.

डॉ. ज्ञानेश्वर चौबे यांनी भारतीय जनसमुदायाच्या वांशिक जडणघडणी संदर्भात जेनेटिक पुराव्या बद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला त्या अहवाला ते म्हणतात, ‘जेनेटिक पुराव्यावरून अलीकडच्या काळात भारतीय उपखंडात बाहेरून मोठा समुदाय आला असल्याचे सिद्ध होत नाही. तसेच त्यातून आर्य आक्रमणाचा सिद्धांत सुद्धा फेटाळला जातो. उलट यातून एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे आर्य बाहेरून हिंदुस्थानात आले असे नसून ते हिंदुस्थानातून बाहेर गेले या सिद्धांताला बळकटी मिळते.

हिंदुस्थानात बोलल्या जाणाऱ्या भाषांचे प्रमुख चार गट आहेत. त्यातील सर्वात मोठा गट इंडो युरोपियन भाषा बोलणाऱ्यांचा आहे. ही भाषा बोलणाऱ्यांचे वास्तव्य उत्तर, मध्य आणि पश्चिम हिंदुस्थानात आहे. दुसरा मोठा गट द्रविड भाषिकांचा आहे. ही भाषा बोलणारा जनसमुदाय हिंदुस्थानच्या दक्षिणेत वास्तव्य करत आहे.‌ या दोन्ही भाषिक गटांमध्ये एकाच प्रकारची जात पद्धत आढळते. या दोघांचे मातृ आणि पितृक जीन पूल एकच असल्याचे आढळून आले आहे. यावर झालेल्या सखोल संशोधनावरून हे ध्यानात येते की विशिष्ट भाषिक संलग्नतेच्या आधारावर येथील प्रारंभीच्या वसाहतींच्या लोकांबद्दल विधान करणे योग्य होणार नाही. कारण दृढमुल जेनेटिक वंशावळी या भाषिक गटांपेक्षा अधिक जुन्या असतात.’

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पशुंच्या शरीररचनाशास्त्राच्या आधारावर एक गोष्ट आता नक्की झाली आहे.‌ ती म्हणजे ऋग्वेदात अश्वमेधीय घोड्याचे वर्णन करण्यात आले आहे. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की ज्याच्यावर युद्धात आघात होऊ शकतात अशा घोड्याला दोन्ही बाजूंना मिळून ३४ बरगड्या असतात. म्हणजे या घोड्यांमध्ये बरगड्यांच्या १७ जोड्या असतात. या उलट मध्य आशियातील घोड्याला दोन्ही बाजूंच्या मिळून ३६ बरगड्या आहेत. आर्यांचे मध्य आशियातून घोड्यावरून किंवा घोड्याच्या रथातून हिंदुस्थानात आगमन झाले असते तर त्यांनी आपल्या अश्वमेधासारख्या अत्यंत महत्त्वाच्या यज्ञात ३४ बरगाड्यांचा म्हणजेच बरगड्यांच्या १७ जोड्या असलेला कमी विकसित घोडा उपयोगात आणला नसता.

हे आणि असे अनेक पुरावे आता उपलब्ध झाले आहेत. त्या पुराव्यावरून आता आर्य बाहेरून म्हणजे मध्य आशियातून हिंदुस्थानात आले हा सिद्धांत मोडीत निघाला आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. याचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत राष्ट्रीय आणि सांस्कृतिक कार्य म्हणून करणे आपले कर्तव्य आहे.

(लेखक व्याख्याते आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.