मुंबई पोलिसांनी आंतरराष्ट्रीय जॉब रॅकेटचा केला पर्दाफाश; दोघांना यूपीतून अटक

153

‘नोकरी डॉट कॉम’ आणि ‘टाईम्स जॉब डॉट कॉम’वर नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना लक्ष करून त्यांना परदेशात नोकरीचे अमिष दाखवून ऑनलाईन पैसे उकळणारी आंतरराष्ट्रीय टोळी मुंबई पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आली आहे. मुंबईतील माटुंगा पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि नवी दिल्ली येथून दोन उच्चशिक्षित तरुणांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही तरुणांनी मुंबईसह देशभरात शेकडो गरजवंतांची कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली आहे.

विकास कुमार महेंद्रप्रताप यादव (२४) आणि रिषभ मनीष दुबे (२३) असे अटक करण्यात आलेल्या दोघांचे नावे आहेत. विकास कुमार उत्तर प्रदेशातील नोएडा, तर रिषभ हा लखनऊ येथे राहणारा आहे. या दोघांनी पंजाबच्या लवली युनिव्हर्सिटी येथून बी-टेकचे शिक्षण घेतले आहे.

दादर पूर्व येथे राहणारे ६०वर्षीय तक्रारदार यांनी नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवर नोकरीसाठी स्वतःची वैयक्तिक माहिती अपलोड केली होती. त्यानंतर त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने सिलेक्शन झाले आहे, दुबई येथील एका कंपनीत आपल्याला नोकरी देण्यात येत असे सांगून तक्रारदार यांना मेलवर सिलेक्शन पत्र पाठवून वेगवेगळी कारणे सांगून त्यांना ऑनलाईन पैसे भरण्यासाठी सांगितले. तक्रारदार यांनी थोडेथोडे करून पावणे दोन लाख रुपये ऑनलाईन भरले, तक्रारदार यांच्याकडून आणखी पैसे मागू लागल्यामुळे तक्रारदार यांना संशय आला आणि त्यांनी भरलेले पैसे परत मागताच फोन बंद झाले.

फसवणूक झाल्यामुळे अखेर माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त डॉ.प्रवीण मुंढे, माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर अधिकारी सपोनि. दिगंबर पगार, सुनील पाटील, पोलीस हवालदार नथुराम चव्हाण, संतोष पवार, मंगेश जर्हाड या पथकाने तांत्रिकरित्या तपास करून आंतरराष्ट्रीय जॉब रॅकेटचा शोध घेऊन यूपीच्या नोएडा आणि लखनऊ येथून दोघांना अटक करण्यात आली.

(हेही वाचा – अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरण: बडतर्फ अधिकारी सुनील मानेला होतोय पश्चाताप)

या दोघांजवळून ३ लॅपटॉप, ४० सिमकार्ड, २५ डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड, ५ मोबाईल फोन आणि ६ बँक पासबुक हस्तगत करण्यात आले आहेत, दरम्यान चौकशीत या टोळीवर देशभरात १२ गुन्हे दाखल असून शेकडो लोकांची फसवणूक केली असल्याची शक्यता पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत वर्तवली आहे. तसेच या दोघांचे बँक खाते गोठवण्यात आले असून या दोघांनी वर्षभरात सुमारे दीड कोटींचे आर्थिक व्यवहार केल्याची माहिती डॉ. मुंढे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.