मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यानंतर आता शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणुका घेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या घटनेनुसार लवकरच या निवडणुका होणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारीला संपुष्टात आली. त्यानंतर आता पक्षाचा ताबा शिंदेंकडे आल्यामुळे शिवसेनेच्या घटनेनुसार या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवारी (२१ फेब्रुवारी) आयोजित करण्यात आली आहे.
कार्यकारिणीच्या बैठकीला शिवसेनेचे आमदार, खासदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्षाच्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, त्यात पक्षाची मालमत्ता, निधी आणि कार्यालये, यावर हक्क सांगण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्यासंदर्भात यावेळी रणनीती ठरवली जाईल.
(हेही वाचा शिंदेच्या शिवसेनेचा आनंद औटघटकेचा – संजय राऊत)
प्रमुख नेत्याची होणार निवड
शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केली जाणार आहे. घटनेनुसार या प्रमुख पदाला नाव काय द्यावे, यावर मुख्यत्वे चर्चा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख हे पद घटनाबाह्य असल्याचा दावा आधीच शिंदेंच्या वतीने करण्यात आला आहे. तर शिवसेनेत मुख्य नेता असे पदच नसल्याचे उद्धव ठाकरेंचे म्हणणे आहे. त्यामुळे कार्यकारी अध्यक्ष किंवा कार्याध्यक्ष, अशा काही नावांचा विचार केला जात असल्याचे कळते.
या विषयांवर होणार चर्चा
कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेच्या नव्या वाटचालीबद्दल चर्चा होईल. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या नेत्यांची निवड केली जाईल. शिवाय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘एबी फॉर्म’वर कुणाची सही असावी, यासंदर्भात ठराव संमत केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Join Our WhatsApp Community