मुंबई पोलीस भरतीसाठी अमरावती येथून आलेल्या तरुणाला मैदानी चाचणीनंतर अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी मुंबईतील फोर्ट येथे घडली. भरतीसाठी आलेल्या उमेदवाराचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी कलिना येथील मुंबई विद्यापीठात मैदानी चाचणी दरम्यान वाशीम जिल्ह्यातून आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला होता. फोर्ट येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
( हेही वाचा : आता शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन नव्हे, ठाण्यातील ‘आनंदाश्रम’ )
अमर अशोक सोलके(२४) असे मृत तरूणाचे नाव असून तो अमरावती जिल्ह्यातून मुंबईत पोलीस भरतीसाठी आला होता. मंगळवारी दादर नायगाव येथे पोलीस मैदानात त्याची चाचणी होती, धावण्याची चाचणी पूर्ण करून तो मुंबईतील फोर्ट येथे आला व तेथील रेसिडेन्सी हॉटेलमध्ये त्याने खोली घेतली होती. हॉटेलच्या खोलीत आल्यानंतर सायंकाळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने मुंबईतील ओळखीच्या व्यक्तीला फोन करून कळवले.
त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास सोलके हॉटेलमध्ये अंघोळ करत असताना त्याला उलटी झाली व तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला तात्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केल्याची माहिती माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांनी दिली.
या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलेला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पवार यांनी सांगितले. मुंबई पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणीच्या दरम्यान घडलेली दुसरी घटना असून या घटनेमुळे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Join Our WhatsApp Community