पी डिमेलो रोडवरून थेट ग्रँट रोडला पोहोचा सात मिनिटांमध्ये; पूर्व मुक्त मार्ग ते कोस्टल रोडला जोडणारे पूल बांधणार महापालिका

174

मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने तब्बल ५.५६ किलोमीटर लांबीचा पूल अर्थात उन्नत बनवण्याचा निर्णय घेतला. ५ हजार ५६० मीटर लांबीचा हा पूल प्रत्यक्षात आणण्यासाठीची प्रशासकीय कार्यवाही महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात प्रगतीपथावर आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. उन्नत मार्गाच्या उभारणींनंतर पूर्व मुक्त मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होऊन प्रवासाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच सागरी किनारी रस्त्याला पूर्व मुक्तमार्गाशी जोडण्यासाठीही हा मार्ग महत्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे हा मार्ग डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग, रफी अहमद किडवाई मार्ग, पोर्ट ट्रस्ट क्षेत्र, पी. डिमेलो रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग, ग्रँट रोड परिसर, ताडदेव आणि मुंबई सेंट्रल या भागातील वाहतुकीच्या दृष्टीकोनातून महत्वाचा ठरणार आहे.

उन्नत मार्ग हा दक्षिण मुंबईतील पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट नजिक सुरू होणाऱ्या पूर्व मुक्तमार्ग येथून प्रस्तावित करण्यात आला असून तो ग्रँट रोड स्टेशन परिसरापर्यंत असणार आहे. पूर्व मुक्त मार्ग ते ग्रँटरोड स्टेशन परिसर या सुमारे ५.५६ किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी सध्या ३० मिनिटे ते ५० मिनिटे एवढा कालावधी लागतो. मात्र, भविष्यात हे अंतर कापण्यासाठी उन्नत-मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाल्यानंतर तेवढ्याच अंतरासाठी केवळ ६ ते ७ मिनिटे लागतील. ही बाब लक्षात घेता दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत व अधिक सुलभ करण्यासह अधिक वेगवान होण्यासही या प्रस्तावित उन्नत मार्गामुळे मोठे बळ मिळणार आहे, असा विश्वासही पूल खात्याद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.

या उन्नत मार्गाचे बांधकाम करण्यासाठी मुंबई महापालिकेने २२ फेब्रुवारी २०२३ रोजी निविदा आमंत्रित केल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने पार पाडल्या जाणाऱ्या या निविदा प्रक्रियेची सविस्तर माहिती मुंबई महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. या कामासाठी ६६२.४२ कोटी (जीएसटी सह) इतका खर्च अंदाजित आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी ४२ महिन्यांचा (पावसाळ्यासह) कालावधी लागू शकतो.

(हेही वाचा – पहिल्या इयत्तेत प्रवेशासाठी मुलांचे वय ‘6+’ असणे गरजेचे! शिक्षण मंत्रालयाचे निर्देश)

पूर्व मुक्तमार्गास जोडलेल्या पी. डिमेल्लो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित उन्नत मार्ग (पूल) हा अत्यंत आवश्यक आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील नागरिकांचा प्रवास अधिक सुखद होऊन दक्षिण मुंबईतील विविध ठिकाणी उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका होण्यास मदत झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उन्नत मार्गाच्या उभारणींनंतर पूर्व मुक्त मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होऊन प्रवासाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.