सावरकरांचा इतिहास विषयक दृष्टीकोन

    215

    स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वाचा सिद्धांत मांडला. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वाच्या ईश्वराकडे पसायदान मागितले, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्वाचा सिद्धांत हा वैश्विक होता. खर्‍या अर्थाने तो मानवतावादी होता. हिंदुत्व हा ग्रंथ खरोखर अद्भूत आहे. आधुनिक युगाची गीता ठरावी इतके सामर्थ्य या ग्रंथात आहे. इतका अद्भूत, सर्वसमावेशक, वैश्विक आणि व्यापक विचार आधुनिक काळात कुणीच मांडलेला नाही.

    कॉंग्रेसने हिंदी राष्ट्रवाद नावाचा एक वेगळा सिद्धांत मांडला होता. तो सर्वसामान्यांमध्ये रुजला असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. तत्कालीन मुसलमान सामाजाने हिंदी राष्ट्रवाद नाकारला आहे. उलट हिंदुंनीच हिंदी राष्ट्रवादाचा उदो उदो केला. मूलतः हिंदू मुस्लिम ऐक्य या हट्टासाठी हिंदी राष्ट्रवाद मांडण्यात आला. मात्र मुसलमान समाजाने या नव्या सिद्धांताकडे पाठ फिरवल्यामुळे कॉंग्रेसला हा सिद्धांत हिंदुंच्या माथी मारण्याशिवाय पर्याय नव्हता. कॉंग्रेसच्या अशा फाजील हट्टामुळे भारताला रक्तरंजित फाळणीचा सामना करावा लागला. आधुनिक काळात राष्ट्रवादाचा व्यवस्थित सिद्धांत मांडला तो सावरकरांनी आणि आज भारत देश सावरकरांच्या वैचारिक मार्गावरुन चालत आहे. कॉंग्रेसने राष्ट्रवादाबाबत गोंधळ निर्माण केला होता. सावरकरांनी मात्र स्पष्ट भूमिका घेतली.

    सावरकरांचे व्यक्तिमत्व धाडसी होते, ते शूर होते, त्यांना आपल्या पूर्वजांविषयी आदर होता, आपल्या इतिहासाबद्दल अभिमान होता आणि हौतात्म्याचे एक वेगळेच आकर्षण होते. सावरकरांनी केलेले प्रत्येक कार्य त्यांनी भारतमातेला अर्पण केले आहे आणि ही हिंदू भूमी आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते. म्हणूनच सावरकर इतिहासाकडे पाहताना हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून पाहायचे. सावरकरांची भारतमातेवर प्रचंड निष्ठा होती. देशासाठी प्राण अर्पण करुन मिळालेली मुक्ती त्यांना प्रिय होती. सावरकरांच्या इतिहास लेखनात आणि इतिहास विषयक ललित साहित्यात राष्ट्राविषयी निष्ठा दिसून येते. आपला पती बंदिवान झाला असतानाही शत्रूला शरण न जाता, पुरुष वेष धारण केलेली सुलोचना म्हणते, ‘आता शरण नव्हे रण मारित मारित मरण.’

    ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’, ’भारताच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने’, ’हिंदुपदपादशाही’, नेपाली आंदोलनाचा इतिहास’ हे सावरकरांचे इतिहासविषयक ग्रंथ आहेत. सावरकरांना लहानपणापासूनच इतिहासाचे आकर्षण होते. त्यांना बालपणापासूनच वाचनाची आवड होती. छत्रपती आणि पेशव्यांच्या बखरीच्या वाचनाने त्यांच्या मनात मराठी सत्तेबद्दल आदर निर्माण झाला होता. इतिहासाच्या माध्यमातून झालेल्या संस्काराद्वारे त्यांच्या मनात पराक्रमाची भावना जागृत झाली होती. किशोरवयात त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अष्टभुजा देवीसमोर घेतलेल्या शपथेची तुलना छत्रपतींनी स्वराज्य निर्मितीसाठी रायरेश्वरासमोर घेतलेल्या शपथेशी करता येईल. कारण या दोन्ही महापुरुषांनी तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना स्वातंत्र्यप्राप्तीची शपथ घेतली आणि ती पूर्ण करुन दाखवली.

    सहा सोनेरी पाने या ग्रंथात सावरकर लिहितात, ‘आमच्या महाशालेय काळातच आम्ही त्या वेळच्या मराठी इतिहासाच्या विस्तृत पण विस्कळित पसार्‍यावर हिंदुराष्ट्र दृष्टीच्या विद्द्युल्लतेचा प्रकाशझोत टाकताच आमचे मनही अकस्मात प्रकाशमय झाले.’ काही लेखकांचे असे मत आहे की सावरकर अंदमानात गेल्यानंतर त्यांचा दृष्टीकोन हिंदुत्ववादी झाला. मात्र सावरकरांचे वरील नमूद वाक्य पाहता त्यांचा या दृष्टीकोनाला महाविद्यालयीन काळातच आकार प्राप्त झाला होता. सावरकरांच्या साहित्यात हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र असे शब्द अनेकदा येतात व त्यांचा उल्लेख गौरवाने झालेला आहे. सावरकरांनी हिंदुंच्या इतिहासावर झालेल्या टीकेचे खंडण केले आहे. ‘हिंदुंचा इतिहास हा पराभवाचा आहे’, ही अंधश्रद्धा सावरकरांनी दूर केली. ‘भारताच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने’ हा ग्रंथ त्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरतो. या ग्रंथाद्वारे सावरकरांनी दाखवून दिले की आपला इतिहास पराभवाचा नसून पराक्रमाचा आहे. आपण प्रत्येक दशकांत पराक्रम गाजवला आहे. बरे, हिंदुत्ववादी दृष्टीकोन जोपासताना हिंदुंनी केलेल्या चुकांवर सावरकरांनी जोरदार हल्ला चढवला आहे. त्यामुळे जरी त्यांचा दृष्टीकोन हिंदुत्ववादी असला तरी हा हिंदुत्ववाद बुद्धिनिष्ठेच्या भक्कम पायावर उभा आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

    सावरकरांच्या इतिहास लेखनाचा परिणाम इंग्रजांवर झाला. १८५७ची लढाई हे सामान्य बंड नसून ते स्वातंत्र्यसमर आहे असे सावरकरांनी पटवून दिले. हा ग्रंथ सावरकरांनी मराठीत लिहिला होता. त्यांनी हा ग्रंथ इंग्लंडहून भारतात पाठवला होता. अभिनव भारत ही संस्था या ग्रंथाचे प्रकाशन करणार होती. परंतु हा ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीच ब्रिटिशांनी त्यावर बंदी घातली. म्हणून हा ग्रंथ पुन्हा सावरकरांना पाठवण्यात आला. पुढे त्या ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर झाले आणि इंग्लंडमध्ये हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. पहिल्या महायुद्धाच्या वेळी डॉ. कुटिनो (अभिनव भारत संघटनेचे कार्यकर्ते) यांनी मूळ मराठी ग्रंथ अमेरिकेत नेला. १९४६ मध्ये इंग्रजांनी या ग्रंथावरील बंदी उठवली तेव्हा त्यांनी हा ग्रंथ सावरकरांना परत सुपूर्त केला. सावरकरांनी लिहिलेल्या या इतिहासविषयक ग्रंथाची दहशत इंग्रजांनी घेतली होती. सावरकरांचा इतिहास लेखनाचा दृष्टीकोन इंग्रजांनी ओळखला होता.

    आपला इतिहास कसा लिहावा आणि कसा वाचावा याविषयी सावरकरांची भूमिका स्पष्ट होती. मात्र ही भूमिका मांडताना त्यांनी बुद्धिनिष्ठेचा त्याग केला नाही हे विशेष. सावरकर भारताच्या इतिहासाकडे हिंदुत्वाच्या दृष्टीकोनातून पाहायचे आणि त्यांनी इतिहासाचे लेखन सुद्धा हिंदुत्वाच्या दृष्टीकोनातून केले आहे.

    – जयेश शत्रुघ्न मेस्त्री

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.