मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांनी महापालिकेच्या वापरातील सर्व वाहने ही इलेक्ट्रीकवरील वापराची असतील अशाप्रकारची घोषणा केली. त्यानुसार महापालिकेच्या ताफ्यातील सर्व वाहने ही पर्यावरण पुरक इलेक्ट्रीक आधारित केली जातील, असे सांगणाऱ्या महापालिका आयुक्तांनाच आता इलेक्ट्रीक वाहनाचा विसर पडला आहे. महापालिका आयुक्तांसाठी महापालिका प्रशासनाने नवीन वाहन खरेदी केले असून हे वाहन इलेक्ट्रीक नसून ते पेट्रोलवर चालणारे आहे. त्यामुळे याआधीच्या पर्यावरण मंत्र्यांच्या प्रेमात असणाऱ्या चहल यांना आता ठाकरे सरकार जाताच विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई महापालिकेच्या ताफ्यात सध्या ९६६ वाहने असून ही सर्व वाहने पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवर चालणारी आहेत. या वाहनांचा ताफा इलेक्ट्रीकवर आधारित करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने करून या वाहनांसह बेस्टच्या बसही पर्यावरण पुरक इलेक्ट्रीकवर आधारित करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी केली होती.
चहल हे एकाबाजुला पर्यावरण पुरक इलेक्ट्रीक वाहनांसाठी आग्रही असताना दुसरीकडे स्वत:साठी पेट्रोलवर चालणारे वाहन खरेदी केले आहे. अतिरिक्त आयुक्त शहर यांच्या स्वाक्षरीने १३ फेब्रुवारी २०२३ रोजी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या वापरासाठी एक स्कोडा स्लाव्हिया पेट्रोल बी एस ६ हे वाहन खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे वाहन जेएमडी ऑटो इंडिया लिमिटेड कंपनीकडून खरेदी केले जाणार आहे. १८ लाख ८ हजार रुपये एवढी या वाहनाची किंमत आहे.
मागील ऑगस्ट २०२१ला महापालिकेच्या ताफ्यात पहिले इलेक्ट्रीकवर आधारित वाहन सामील झाले होते. हे वाहन महापालिकेने तत्कालिन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वापरासाठी दिले होते. महापौरांसाठी पहिले इलेक्ट्रीक वाहन खरेदी केल्यानंतर अशाप्रकारची वाहने आयुक्तांसह इतर अतिरिक्त आयुक्त आणि समित्यांच्या अध्यक्षांसाठी खरेदी केली जाणार होती. परंतु आयुक्तांसाठी खरेदी केलेले वाहन हे पेट्रोलवर चालणार आहे. त्यामुळे पर्यावरण पुरक इलेक्ट्रीक आधारित वाहन स्वत: वापरुन एक आदर्श निर्माण करण्याऐवजी महापालिका आयुक्तांनी स्वत:साठी पेट्रोलवर आधारित वाहन खरेदी महापालिकेचे पर्यावरण प्रेम दाखवून दिले.
(हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा परिसर फेरीवालामुक्त)
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्कोडा वाहन हे इलेक्ट्रीक वाहन नसून ते पेट्रोलवर आधारितच आहे. आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी कोणते वाहन खरेदी करायचे याचे निकष आहेत आणि त्यानुसार त्यांची खरेदी केली जात आहे. त्यामुळे आयुक्तांसाठी खरेदी केले जाणारे वाहन इलेक्ट्रीकवर आधारित नसल्याने पेट्रोलवर आधारित वाहनाची खरेदी केली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community