बेस्टच्या वातानुकूलित बसेसना आग लागण्याचे प्रकार घडत असल्याने मातेश्वरी अर्बन टान्सपोर्टच्या ४०० सीएनजीवर आधारीत बसेस मागे घेण्याचे निर्देश बेस्ट उपक्रमाने दिल्यानंतर टाटा मोटर्स इंजिनिअरिंगची एक टीम लखनऊहून मुंबईत येवून सुरक्षा मापदंडाची पाहणी करण्यास सुरुवात केली. येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये ही तपासणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. या ४०० बसेस रस्त्यावर न उतरवण्यात आल्याने बेस्टने आपल्या ताफ्यातील २९७ बसेस पुन्हा रस्त्यावर उतरवल्या.
अंधेरी पूर्व येथील आगर चौक येथे वातानुकूलित बसेसला आग लागण्याचे प्रकार घडल्यानंतर मेसर्स मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट लिमिटेड या कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या टाटा सीएनजी बसेसमधील आगीच्या घटना घडणार नाही, याची खात्री करण्यासाठी देखभाल आणि दुरुस्ती आदींबाबतच्या सुधारणात्मक उपाययोजना करेपर्यंत या सर्व ४०० बसेस रस्त्यावर न उतरवण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.
त्यानुसार या कंपनीच्या ४०० सीएनजी बसेस गुरुवारी रस्त्यावर उतरवण्यात आल्या नाही. या बसेसची तपासणी करण्यासाठी टाटा मोटर्स इंजिनिअरिंगची एक टीम लखनऊहून आली. सुरक्षा मानके आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी या सर्व बसची पुन्हा तपासणी करत आहे. एकदा त्यांनी सुरक्षा मापदंडांची तपासणी पूर्ण केल्यावर आणि आवश्यक मंजुरी आणि लेखी वचनबद्धता आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या बसेस तपासणीनंतर रस्त्यावर आणल्या जाणार आहेत. त्यामुळे येत्या ६-७ दिवसांमध्ये या तपासणी व सराव पूर्ण होण्याची शक्यता आहे. बेस्टने प्रवाशांची सुरक्षितता अत्यंत महत्वाचा असल्याने हा निर्णय घेतला असून याबाबत प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे. दरम्यान बेस्टच्या ताफ्यातील ४०० वाहने रस्त्यावर न उतरल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता उपक्रमाने आपल्या २९७ बसेस गुरुवारी रस्त्यावर आणल्या. त्यामुळे मोठ्याप्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला.
Join Our WhatsApp Community