जिवंत मुलाला मृत दाखवून विम्याचे २ कोटी लाटण्याचा प्रयत्न

179

जिवंत मुलाला मृत दाखवून भारतीय आयुर्विमा मंडळाकडून (एलआयसी) बनावट कागदपत्रांच्या आधारावर २ कोटींचा विमा लाटण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मायलेका विरुद्ध दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या मायलेकाचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिनेश टाकसाळे आणि त्यांची आई नंदाबाई टाकसाळे असे या मायलेकाचे नाव आहे. २०१५ साली दिनेश टाकसाळे  याने दादर येथील एलआयसी कार्यालयात जाऊन पॉलिसीसाठी अर्ज केला होता, त्याने अर्जात तो अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी त्याचे शेतीमध्ये वार्षिक उत्पन्न ३८ लाख रुपये असून तो कँटीन देखील चालवत असून त्याचे उत्पन्न लाखाच्या घरात असल्याचा दावा अर्जात केला होता. त्याने या संबंधीचे कागदपत्रे एलआयसी कार्यालयात सादर केली होती. यानंतर, एलआयसीने त्याला २ कोटी रुपयांची पॉलिसी ऑफर केली. त्यानंतर, दिनेशने तीन महिन्यांसाठी सुमारे १ लाख रुपये प्रीमियम भरला. त्यानंतर, त्याने प्रीमियम भरणे बंद केले, असे पोलिसांनी सांगितले. जवळपास दीड वर्षानंतर, २०१६ साली दिनेशची आई नंदाबाई हिने एलआयसी कार्यालयात संपर्क साधून मुलाचा अहमदनगर येथे अपघाती मृत्यू झाला असल्याचा दावा केला. तिने जोडलेल्या कागदपत्रात मृत्यूचे प्रमाणपत्र सादर करून २ कोटींच्या  विमासाठी एलआयसीकडे दावा केला.

हे प्रकरण एलआयसीच्या अधिकाऱ्याकडे गेले आणि त्यांनी या दाव्यासाठी सादर केलेले कागदपत्रे तपासली, त्याच सोबत अहमदनगर येथे भेट दिली. अपघात कुठे आणि कसा झाला याची माहिती काढण्यात आली. एलआयसी  अधिकारी यांना कागदपत्रांचा संशय आला. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना टाकसाळे यांनी सादर केलेले कागदपत्रे ही बनावट असल्याचे समोर आले. शिवाय दिनेश टाकसाळे याचा मृत्यू झालेला नसून तो जिवंत असल्याचे समोर आले. तसेच नंदाबाई टाकसाळे यांनी सादर केलेले मुलाचे मृत्यूपत्र बोगस असल्याचे उघड झाले. या प्रकरणी एलआयसीच्या दादर कार्यालयाच्या शाखा व्यवस्थापक यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शिवाजी पार्क पोलिसांनी फसवणूक, बनावट दस्तवेज तयार करणे याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप दोघांना अटक करण्यात आलेली नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(हेही वाचा – भारतीय महिला आणि तरुणींची आखाती देशात विक्री; मुंबई, ठाण्यात रॅकेट कार्यरत)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.