दादरमधील फेरीवाल्यांच्या कचऱ्याचा भार दुकानदारांवर; व्यापारी संघाची मुख्यमंत्र्यांकडे धाव

248

दादरमधील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून आता दुकानदारही महापालिकेवर नाराज झाले आहेत. महापालिकेच्या जी उत्तर विभागाने, रात्री दुकान बंद करताना तिथे कचरा करू नये असे बजावले आहे. परंतु दादर मध्ये रस्त्यांवर कचरा हा फेरीवाल्यांमुळे होत असून त्यांच्यावर कारवाई न करता अधिकृत कर भरणाऱ्या दुकानदारांना महापालिकेने नोटीस पाठवून समज दिल्याने दादरमधील दुकानदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत या नोटीस मागे घेण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

( हेही वाचा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना : अबतक १०७ )

मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या वतीने दादरमधील सर्व दुकानदारांनी आपली दुकाने रात्री बंद करताना बाहेर कचरा करू नये तसेच आस्थापनामुळे झालेला कचरा नजिकच्या कचराकुंडीत टाकून आपल्या परिसराची स्वछता राखावी अशा प्रकारचे आदेश बजावण्यात आले आहेत. या आदेशाबाबत दादर व्यापारी संघाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत कैफियत मांडली.

या निवेदनात दादर व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील शाह असे म्हणतात की, दादर मधील सर्व व्यापारी आपापल्या आस्थापनाचा कचरा जवळील कचराकुंडीतच टाकत आहेत आणि अनेक वर्षापासून हिच पद्धत अवलंबत आहेत. कारण कुठल्याही दुकानदाराला आपल्या दुकाना समोरील परिसर स्वच्छच ठेवायला आवडतो. व त्यानुसार दुकानदार हा समोरील भाग स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करित असतो. याउलट रस्त्यावरील कचरा हा फेरीवाल्यांमार्फत मोठ्या प्रमाणात केला जात आहे. दादर विभागात एकतर अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे मोठ्या प्रमाणात आहेत. हा असा कचरा त्यांचा आहे.

त्यामुळे अशाप्रकारचा आदेश हा खरेतर अशा अनधिकृत व अधिकृत फेरीवाल्याना व खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्याना उद्देशून काढला गेला पाहिजे. पण तसे न करता असा आदेश दुकानदारां करता काढणे हे चुकीचे आहे.असे सुनील शाह यांनी म्हटले आहे. एकतर दुकानदार हे सर्व प्रकारचे कर भरून राज्यसरकार प्रती आपले उत्तरदायित्व निभावतात आणि फेरीवाले कुठलाही कर न भरता तसेच कायद्याचे उलंघन करून व्यापार करित असताना असा आदेश काढणे म्हणजे ” चौराला सोडून संन्याश्याला धरण्यासारखे आहे, अशा शब्दांत त्यांनी महापालिकेच्या या आदेशा विरोधात नाराजी व्यक्त केली.

कोरोनाच्या महामारीमध्ये दादर व्यापारी संघाने भारतात लॉक डाऊन सुरु होण्याच्या दोन ते तीन दिवस आधी तत्कालीन जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांना भेटून सर्वप्रथम शासनाला सहकार्य म्हणून सर्व दुकाने पुढील आदेश मिळेपर्यंत दादर बाजार पेठ लॉक डाऊन मध्ये सहभागी झाली होती, तसेच करोनाच्या लॉक डाऊनमध्येही दादर व्यापारी संघाने पोलीस व महापालिकेच्या अधिकारी वर्गास मास्क, सॅनीटाईझर व हॅन्ड ग्लोव्हस चे वाटप केले होते ते एक समाजिक जाणीव व कर्तव्य म्हणूनच. केले होते. त्यामुळे आपण शासनाचे प्रमुख व नागरिकांचे तारणहार या नात्याने आमची व दादर मधील समस्त नागरिकांची व्यथा आपल्या समोर मांडीत आहोत. आपण एक सुजाण राज्यकर्ते आहात म्हणून आपल्या कडे मोठ्या आशेने आमची कैफियत मांडीत आहोत त्याचा आपण सरासार विचार करून निर्णय घ्यावा,अशी विनंती दादरच्या व्यापारी संघाने मुख्यमंत्री यांना केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.