भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार-जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी राज्यात देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ निर्माण करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी दिली.
मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना लोढा म्हणाले, स्वा. सावरकरांचे जन्मस्थान भगूर, जि. नाशिक येथे भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालय उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने याकरिता पुढाकार घेतला असून येत्या २६ फेब्रुवारी रोजी स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथे भव्य अभिवादन पदयात्रा व कार्यक्रमाचे आयोजनही पर्यटन विभागातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास असंख्य सावरकरभक्त नागरिक, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
‘स्वा. सावरकर आत्मार्पण दिना’निमित्त २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.०० वाजता भगूरमधील नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी भव्य अभिवादन पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत अष्टभुजा देवीची पालखीही सहभागी असणार आहे. त्यानंतर सकाळी ९.०० ते १०.३० दरम्यान सावरकर वाडा येथील मुख्य कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक चारुदत्त दीक्षित व सहकलाकारांचे स्वा. सावरकर लिखित गीतांचे गायन, योगेश सोमण लिखित-दिग्दर्शित ‘सावरकर आणि मृत्यू’ या संवादाचे बद्रीश कट्टी व आदित्य धलवार यांचे अभिवाचन, मान्यवरांचे सत्कार आदी कार्यक्रम होणार आहेत.
(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पहिला व्हर्च्युअल रिअॅलिटी चित्रपट येणार; योगेश सोमण यांचे लेखन, दिग्दर्शन)
पर्यटन सर्किटमध्ये काय काय?
- भगूरमधील या कार्यक्रमात पर्यटन विभागाच्या माध्यमातून देशातील पहिल्या ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ची घोषणा करण्यात येणार आहे. या पर्यटन सर्किट मध्ये सावकर यांचे जन्मस्थान भगूर वाडा आणि अष्टभूजा देवी मंदिर, अभिनव भारत मंदिर तिळभांडेश्वर गल्ली,नाशिक, पुणे येथील सावरकर अध्यासन केंद्र,डेक्कन, पहिली विदेशी कपड्यांची होळी, पतितपावन मंदिर रत्नागिरी येथील, शिरगाव रत्नागिरी येथे सावरकर काही काळ वास्तव्यास होते ती खोली मालक आणि सावरकराचे सहकारी दामले यांनी तशीच ठेवली आहे तसेच डॉ. हेडगेवार आणि सावरकर यांची पहिली भेट झाली, गुरव समाजाचे मारूती मंदिर, विठ्ठल मंदिर, सावरकारांनी सुरू केलेली कन्या शाळा, सावरकर सदन, सावरकर स्मारक दादर,बाबाराव सावरकर स्मारक सांगली या ठिकाणांचा पर्यटन सर्किट मध्ये समावेश आहे.
- तसेच भगूर येथे बनत असलेले ‘थीम पार्क’ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून स्वा. सावरकरांच्या विचार-दर्शनावर आधारित भव्य थीम पार्क व संग्रहालयाची उभारणी करण्यात येणार आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांबाबत पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
- राष्ट्रासाठी असीम त्याग व समर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना, त्यांच्या विचार व कार्याला या भव्य पदयात्रा व कार्यक्रमाच्या निमित्ताने मानवंदना देण्यात येणार आहे. त्यामुळे भगूर, नाशिक शहर, जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून अधिकाधिक सावरकरभक्त नागरिक, कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग तसेच अन्य सहयोगी संस्था-संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
सावरकर विचार जागरणासाठी राज्य सरकारचा पुढाकार
स्वातंत्र्यवीर स्वा. सावरकरांचे कार्य व विचार अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यानिमित्ताने एक राष्ट्रीय विचार जागरण घडवण्याकरिता महाराष्ट्र राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने विशेष पुढाकार घेतला आहे. याच मोहिमेतून भगूर येथे होत असलेला २६ फेब्रुवारी रोजीचा हा कार्यक्रम महत्वाचा आहे. यानिमित्ताने प्रथमच राज्य सरकारतर्फे सावरकर विचार जागरणासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न होत असल्याने नाशिकसह अनेक ठिकाणच्या सावरकरप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Join Our WhatsApp Community