संदीप देशपांडे यांनी ‘त्या’ तक्रारींसंदर्भात घेतली महापालिका आयुक्तांची भेट

165

मुंबई महापालिकेच्या मालाड आणि भायखळा येथील जंबो कोविड सेंटरमधील घोटाळ्याप्रकरणी तसेच केईएम रुग्णालयातील चॅरिटी फंड गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीबाबत पाठपुरावा करण्यासाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोविड सेंटरमधील भ्रष्टाचार प्रकरणाची लाचलूचपत प्रतिबंधक विभाग आणि केईएममधील चॅरिटेबल फंडच्या अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

कोरोना महामारीच्या काळात महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून मोठा घोटाळा केला  असून यामध्ये मालाड येथील जंबो कोविड सेंटर तसेच भायखळा रिचडसन क्रुडास येथील घोटाळ्याचे प्रकरण मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी समारे आणले. या कोविड सेंटरमधील घोटाळा तत्कालिन सहायक आयुक्त महेश पाटील यांच्या माध्यमातून झाल्याचा आरोप करत संदीप देशपांडे यांनी या घोटाळ्याची चौकशी कॅगमार्फत करण्याची महापालिका आयुक्तांकडे केली होती. या मागणीची दखल घेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांना चौकशी करण्याचे निर्देश देत तीन आठवड्यांमध्ये याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

(हेही वाचा औरंगाबाद झाले अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर)

त्यानुसार अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर  मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी आपण केलेल्या आरोपांमध्ये काही व्हॉट्स अप चॅटचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या व्हॉट्स चॅटची शाहनिशा करण्यासाठी मोबाईल फोन जप्त करणे आवश्यक असून हे काम महापालिकेच्या यंत्रणेला करता येणार नसून त्यासाठी ही चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून केली जावी अशी आपण मागणी केल्याचे देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. याबाबतचा अश्विनी भिडे यांचा चौकशीचा अहवाल दोन ते तीन दिवसांमध्ये मिळणे अपेक्षित आहे, त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन चहल यांनी दिल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मंगळवारनंतर ही कार्यवाही होणे अपेक्षित आहे. शुक्रवारपर्यंत आम्ही प्रशासनाची वाट पाहू आणि त्यानंतर मनसे स्टाईलने याचे उत्तर देऊ, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.

याबरोबरच केईएम रुग्णालयातील रुग्ण सहाय्यता निधीमध्ये विविध माध्यमातून मोठ्याप्रमाणात घोटाळा झाला. केईएम रुग्णालयातील रेडीओलॉजी विभागाच्या गरीब रुग्णांसाठी ठेवलेल्या धर्मादाय निधीच्या बॉक्समध्ये अनियमिता आढळून आल्यानंतर संशयितांच्या विरोधात भेाईवाडा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. परंतु या ही चौकशी योग्यरितीने व्हायला अशाप्रकारच्या मागणीसाठीही आपण आयुक्तांची भेट घेत या प्रकरणाची चौकशी पोलिसांमार्फत न करता आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे याची चौकशी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत केली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचेही देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.