आज आपल्या देशात हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी हिंदू समाजाकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सावरकरांनी ‘राजकारणाचे हिंदूकरण’ असे जे सूत्र मांडले आहे त्याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात सावरकर हिंदू धर्म आणि हिंदुत्व याविषयी लिहितात, ‘हिंदुत्व हे हिंदू धर्मापेक्षा निराळे आहे. हिंदू धर्म हा हिंदुत्वापासून निघालेला नसून तो त्याचा एक अंश भाग आहे.’
सावरकर असे म्हणतात कारण हिंदुत्ववादी व्यक्ती हिंदू धर्माचा अभिमान बाळगणारी असली पाहिजे असे बंधन नाही. एखादी व्यक्ती हिंदू असूनही निरीश्वरवादी विचारांची असू शकते. त्यामुळे हिंदुत्व आणि हिंदू धर्म एकच आहेत अशी जर कोणी समजूत करून घेत असेल तर तसा समज करून घेणाऱ्यांना हिंदुत्वात म्हणजेच राष्ट्रीयत्वात धर्म दिसतो. जेव्हा देशाचा राजकारणाशी संबंध येतो तेव्हा तो संबंध हिंदुस्थानाच्या भूमीशी निगडित असतो. याचा संदर्भ आपल्याला विष्णुपुराणात आढळतो.
उत्तरं यत्समुद्रस्य,
हिमाद्रेश्चैव दक्षिणम।
वर्षं तद्भारतं नाम,
भारती यत्र संतति: ।।
म्हणजे दक्षिण समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालय पर्वताच्या दक्षिणेला (कन्याकुमारी पासून ते हिमालयापर्यंत) ज्या देशाची सीमा आहे तो भारत देश या भारत देशाची संतती म्हणजे भारती होय. याच भावनेने भारत देशाच्या या सीमा पांडवांपासून विक्रमादित्यपर्यंत सर्वांनी सुरक्षित ठेवल्या आणि आपल्या राष्ट्राचे आपल्या देशाचे संरक्षण केले. त्याचबरोबर अत्यंत सन्मानाने राज्यकर्ते म्हणून ते वावरले. याचा अर्थ हिंदुस्थानच्या भूमीत विविध धर्माचे लोक आनंदाने राहू शकतात. त्यांनी त्यांच्या धर्माचे पालन करावे. धर्माचे पालन करताना त्यांनी निर्बंधांच्या चौकटीत राहून धर्माचे पालन करावे. त्यांच्या धर्मग्रंथांचे सुखाने वाचन करावे. तथापि त्यांना या देशाशी देशाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेशी निष्ठा बाळगावी लागेल. त्याविषयी अभिमान बाळगावा लागेल. त्याचबरोबर कोणालाही कोणत्याही कारणासाठी कोणाचेही धर्मांतर करता येणार नाही.
(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ५७वा आत्मार्पण दिन; सावरकरांच्या जीवनप्रवासाची रंग-रेषांमधून मांडणी)
धर्माचे नियम वैयक्तिक जीवनात आचरणात आणावे
हिंदुस्थानचे नागरिकत्व स्वीकारलेल्या प्रत्येक व्यक्तीला या अटी पाळून राष्ट्रीय प्रवाहात सहभागी व्हावे लागेल. कोणत्याही धर्माचा पंथाचा अनुयायी असलेल्या कोणालाही कोणत्याही प्रकारे विशेष अधिकार बहाल केला जाणार नाही. अल्पसंख्यांक बहुसंख्यांक या भेदाला वाव दिला जाणार नाही. देशातल्या प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीयत्व भारतीय असल्यामुळे कोणत्याही नागरिकाला त्याच्या जातीचा, उपजातीचा, धर्माचा कोणत्याही प्रकारे विशेष लाभ मिळणार नाही. देशातला प्रत्येक नागरिक समान आहे. त्यामुळे कोणत्याही जातीपातीच्या आणि धर्माच्या नावाखाली कोणालाही सवलती दिल्या जाणार नाहीत. कोणालाही कोणाच्याही धर्मग्रंथातल्या उल्लेखाप्रमाणे सरकारकडून कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही. धर्माचे नियम वैयक्तिक जीवनात आचरणात आणावे. तथापि त्याचा परिणाम राष्ट्रीय जीवनावर होणार नाही याची काळजी घ्यावी. अशा प्रकारची राज्यव्यवस्था अस्तित्वात आणण्यासाठी केलेले राजकीय प्रबोधन म्हणजे राजकारणाचे हिंदूकरण होय.
राष्ट्राचा विचार करता तो हिंदू
१६ मार्च १८८८ या दिवशी मिरजमध्ये भाषण करताना सर सय्यद अहमद म्हणाले, ‘समजा उद्या हिंदुस्थानातून सगळे इंग्रज निघून गेले तर हिंदुस्थानचे राज्यकर्ते कोण होणार? अशा परिस्थितीत ही दोन राष्ट्रे हिंदू आणि मुसलमान एका सिंहासनावर बसू शकतील आणि अधिकारात समान राहतील? हे अजिबात शक्य नाही. तेव्हा एकाने दुसऱ्याला पादाक्रांत करणे आणि त्याला नमवणे हे आवश्यक आहे.’ हिंदुस्थानात मुसलमान आणि हिंदू ही दोन राष्ट्रे आहेत या विचाराला मूठ माती देऊन या देशातला प्रत्येक नागरिक राष्ट्राच्या दृष्टीने हिंदू आहे. मग त्याचा धर्म, जात, पंथ काहीही असो तरी फरक पडत नाही. थोडक्यात देशातल्या नागरिकाचा धर्म कोणताही असला तरी राष्ट्राचा विचार करता तो हिंदू असून व्यक्तिगत जीवनात तो त्याच्या धर्माचा आहे. अशा प्रकारची मानसिकता संपूर्ण राष्ट्रात निर्माण करण्यासाठी केलेली वैचारिक चळवळ म्हणजे राजकारणाचे हिंदूकरण होय. असे सावरकरांना सांगायचे आहे. म्हणून सावरकर म्हणतात हिंदू धर्म आणि हिंदुत्व हे दोन शब्द समानार्थी नाहीत.
(हेही वाचा वीर सावरकरांचा ५७वा आत्मार्पण दिन; शोध हा नवा – शतजन्म शोधिताना)
Join Our WhatsApp Community