औरंगाबादच्या नामांतराला केंद्राने मंजुरी देताच एमआयएमने याला विरोध केला आहे. या पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. त्यावर आता शिवसेना आमदार संजय सिरसाट यांनी जोरदार टीका केली.
काय म्हणाले संजय शिरसाट?
आमच्याकडे आणखी काही मुघल, निजाम बाकी आहेत आणि त्यांना हे नाव आवडणार नाही. त्यांचे म्हणणे त्यांच्या पद्धतीने ठीक आहे. त्यांना राजकारण त्यांच्या पद्धतीने करायचे आहे. ज्या औरंगजेबाने आमच्या संभाजी महाराजांचे हाल केले. त्या औरंगजेबाचे नाव काढून छत्रपती संभाजी महाराजांचे नाव शहराला देताना यांना का त्रास होतो? तुम्ही औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन माथा टेकवतात. आम्ही तुम्हाला विरोध नाही केला. तुम्ही तुमचे राजकारण करा. परंतु औरंगजेबाबद्दल एवढा तुम्हाला पुळका असण्याचे कारण काय? मग आपल्या मुलांची नावे औरंगजेब ठेवा. राजकारण हे प्रत्येक गोष्टीत नसते. महापुरुषांचा अभिमान जागृत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत, तर आमचे काय चुकले? आम्ही दिलेल्या नावाला तुमचा विरोध असण्याचे कारण काय? त्यांना त्यांचे राजकारण करायचे आहे, त्यांना त्यांची मुघलशाही, निजामशाही, औरंगाबाद, निजामाबाद, उस्मानाबाद ही त्यांची ओळख आम्हाला कशाला पाहिजे, असा सवाल शिरसाट यांनी विचारला आहे.
खासदार जलील काय म्हणाले?
महापुरुषांचे नाव घेऊन आम्ही कधीही राजकारण केले नाही. हे लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी असे करत आले आहेत. आम्ही नावाचा विरोध केलेला आहे, करत राहणार आहे. कारण, जेव्हा सरकार म्हणून चांगले काही केले आहे हे दाखवण्यासाठी तुमच्याकडे काही नसते, तर मग अशाप्रकारचे मुद्दे ते वारंवार पुढे आणतात. भावनिक मुद्य्यांमध्ये कसे अडकवण्याचा प्रयत्न केला जातो, हे याचे एक प्रमुख उदाहरण आहे. त्यांच्याकडे संख्याबळ आहे, सरकार त्यांचे आहे. उद्या ते कायदा आणू शकता की आमचे नाव बदलायचे आहे. पण घटनेने मलाही एक अधिकार दिलेला आहे. त्यानुसार मी विरोध करणार आहे, असे खासदार जलील यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community