राज्यात येत्या काळात मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका जाहीर होण्याआधी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा खुला करण्याच्या हालचाली शिंदे-फडणवीस सरकारने सुरू केल्या आहेत.
मुंबई ते नागपूर असा ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) बांधला जात आहे. त्यापैकी ५२० किमीचा पहिला टप्पा (नागपूर-शिर्डी) सेवेत दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ शिर्डी ते भरवीर (तालुका चांदवड, जिल्हा नाशिक) या ८० किमीच्या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा मार्च अखेरीस वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास नागपूर ते नाशिक प्रवास पाच ते साडेपाच तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.
दरम्यान, शिर्डी ते भरवीर टप्पा मार्च अखेरीस सेवेत दाखल झाल्यानंतर भरवीर ते इगतपुरी महामार्ग जूनपर्यंत सुरू करण्याचे नियोजन असल्याचे कळते.
(हेही वाचा – महानगर गॅसचे सिटी गेट स्टेशन सावरोली येथे कार्यान्वित; गॅस वितरण नेटवर्कचा विस्तार)
१३८.४७ मेगावॉट सौर उर्जा निर्मिती
- या प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकूण ८४ बांधकामे प्रस्तावित होती; तथापि गरजेनुसार ही बांधकामे १०० पर्यंत वाढविण्यात आली आहेत. त्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे.
- वन्यजीवांच्या वावरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ठिकाणी ध्वनी रोधकची तरतूद करण्यात आली आहे.
- तसेच, आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंतीची उंची वाढवण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षणाच्या कामांसाठी एकूण ३२६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
- प्रकल्पामध्ये एकूण १३८.४७ मेगावॉट सौर उर्जा निर्मिती प्राथमिक टप्प्यात होणे प्रस्तावित आहे.
- समृद्धी महामार्गामध्ये एकूण ३३.६५ लक्ष लहान मोठी झाडे आणि वेली लावण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये दुतर्फा ११ लक्ष ३१ हजार मोठी झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकल्पाच्या हद्दीमधे झाडे लावणे, सुशोभिकरण करणे. सिंचन व्यवस्था करणे, व संपूर्ण वृक्ष लागवडीची ४ वर्ष देखभाल करण या सर्व कामांसाठी एकूण रुपये ६९४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.