माझगाव येथील शेठ मोती शाह लेन मधील ब्राम्हणवाडी येथील एम.टी.एन.एल लगतच्या अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाच्या बंद करण्यात आलेल्या कामामुळे आता वातावरण चांगलेच तापले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात जैन समाज राहत असून येथील रहिवाशांच्या मागणीनुसार हे काम सुचवल्यानंतर निविदा काढून कार्यादेश दिल्यानंतर ते काम सुरू झाले. परंतु अर्धवट काम मागील काही महिन्यांपासून बंदच असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक माजी नगरसेविकेसह येथील जैन बांधवांच्या शिष्टमंडळाने ई विभागाच्या सहायक आयुक्तांची भेट देत तसेच महापालिका आयुक्तांची भेट घेत या रस्त्यांचे काम त्वरीत सुरू करा, अन्यथा आम्ही न्यायालयात जावू असाच इशारा प्रशासनाला दिला आहे.
माझगाव ब्राम्हणवाडी येथील स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनुसार, तसेच मागणीनुसार एम.टी.एन.एल लगतच्या अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामाबाबत महानगरपालिकेच्या ई विभागाशी सातत्याने पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा महानगरपालिकेने या कामासाठी मेसर्स देव इंजिनिअर्स या ठेकेदाराची निवड करत त्यांना १३ जून २०२२ रोजी कार्यादेश दिला. पण पावसाळयाचे दिवस असल्याने तेव्हा ते काम सुरू करण्यात आले नव्हते. गेल्या दोन महिना आधी ब्राम्हणवाडी येथील स्थानिक रहिवाश्यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करून या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याचे काम सुरू केले होते. परंतु त्याच दिवशी संबंधित कंत्राटदाराने हे काम बंदही केले ते अद्याप बंदच आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड असंतोष व संभ्रम निर्माण झालेला आहे.
स्थानिक रहिवाशांना होणाऱ्या या त्रासाची तक्रार घेऊन स्थानिक माजी नगरसेविका सोनम जामसूतकर आाणि माजी नगरसेवक मनोज जामसूतकर यांच्या नेतृत्वाखालील ब्राम्हणवाडी येथील स्थानिक सोसायटी शंकेश्वर दर्शन (टॉवर) को-ऑप.हौसी. सोसा.लि. (ए विंग) दर्शन (टॉवर) को-ऑप हौसी सोसा.लि. (भी विंग) ऐक्यवर्धक एस. आर. ए. को. ऑप. हौसिंग सोसा.लि. यांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह ई विभागाचे सहायक आयुक्त यादव यांना निवेदन करत या रस्त्यांचे थांबवलेले काम त्वरीत सुरू करण्याची मागणी केली. जर हे काम प्रशासनाने तातडीने सुरू न केल्यास प्रशासनाच्यावतीने न्यायालयात जावू असाही इशारा या शिष्टमंडळाने दिला. या शिष्टमंडळामध्ये शिवसेना प्रभाग २१०च्या उपशाखा संघटक ममता जैन, शंखेश्वर दर्शनचे चेअरमन अशोक जैन, कमिटी मेंबर रमेश सोलंकी, विनोद परमार, धीरज जैन, पिंकी परमार आणि शंखेश्वर दर्शन बी विंगचे चेअरमन उत्तम जैन आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.
(हेही वाचा – मुंबईतील बहुचर्चित ४०० किलोमीटर रस्ते सिमेंट काँक्रिटच्या कामांपैकी ५२ किलो मीटर लांबीच्या कामांना रविवारपासून प्रारंभ)
यानंतर माजी नगरसेविका सोनम जामसूतकर आणि माजी नगरसेवक मनोज जामसूतकर यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांची भेट घेऊन या रस्त्यांच्या थांबवलेल्या कामामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची कैफियत मांडली. त्यामुळे जर या रस्त्यांचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदाराला न दिल्यास याविरोधात महापालिका मुख्यालयावर स्थानिकांचा मोर्चा आणला जाईल आणि यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण जबाबदार असाल असाही इशारा दिला आहे.
Join Our WhatsApp Community