भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भव्य थीमपार्क आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय उभारणार! पर्यटनमंत्र्यांची घोषणा

184

भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान भगूर (जि. नाशिक) येथे वीर सावरकरांचे जीवनकार्य मांडणारे भव्य सावरकर थीमपार्क व आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय भरण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. भगूर येथे वीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त पर्यटन विभागाद्वारे आयोजित पदयात्रा व अभिवादन कार्यक्रमाला संबोधित करताना मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली.

( हेही वाचा : हिंदू राष्ट्रासाठी वीर सावरकरांची दिशा म्हणजे राजकारणाचे हिंदूकरण )

‘स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिना’निमित्त भगूर येथे भव्य अभिवादन पदयात्रा व कार्यक्रमाचे आयोजन पर्यटन विभागातर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमास पर्यटनमंत्री लोढा, ‘विवेक व्यासपीठाच्या अश्विनी मयेकर आदींसह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर असंख्य सावरकरभक्त नागरिक, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार व जीवनकार्य सर्व भारतीयांसाठी एक प्रेरणा आहे व त्यांचे हे जीवनकार्य, विचार भारतातच नव्हे तर जगभरात पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याच अंतर्गत सावरकरांचे जन्मस्थान भगूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय व भव्य थीम पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. यात भगूर येथील गेली अनेक वर्षे अपूर्णावस्थेत असलेले थीम पार्क हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आपल्याकडे हस्तांतरित करून घेत असून त्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होत असल्याची माहिती लोढा यांनी दिली.

वीर सावरकर पर्यटन सर्कीटावर शिक्कामोर्तब

वीर सावरकरांचे जीवनकार्य जगभर पोहोचवण्याच्या या प्रयत्नांतर्गत पर्यटन विभागातर्फे महाराष्ट्रात वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ची निर्मिती करण्याबाबतही पर्यटनमंत्री लोढा यांनी यावेळी घोषणा केली. वीर सावरकरांचे वास्तव्य लाभलेली राज्यातील अनेक ठिकाणे जसे की, भगूरमधील त्यांच्या जन्मस्थानासह नाशिक येथील अभिनव भारत मंदिर, पुणे येथील सावरकर अध्यासन केंद्र, फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतीगृह, सांगलीतील बाबाराव सावरकर यांचे स्मारक, रत्नागिरी येथील ‘सामाजिक समरसतेचे प्रतीक’ अर्थात पतितपावन मंदिर व मुंबई येथील सावरकर सदन आणि सावरकर स्मारक या ठिकाणी पर्यटन शृंखला तयार केली जाणार आहे. यातील प्रत्येक स्थानाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून कसे विकसित करता येईल व जगभरातून अधिकाधिक पर्यटक येथे कसे भेट देतील, याकरिता पर्यटन विभाग विविध प्रकल्प राबवणार असल्याचे मंगलप्रभात लोढा म्हणाले.

वीर सावरकरांना हजारो भगूरकडून अभिवादन

वीर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त पर्यटन विभाग व सहयोगी अनेक संस्था-संघटनांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रा व अभिवादन कार्यक्रमास हजारो भगूरवासी तसेच सावरकरभक्त उपस्थित होते. भगूरमधील नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी भव्य अभिवादन पदयात्रा यावेळी काढण्यात आली. या पदयात्रेत सावरकरांच्या जीवनात महत्वाचे स्थान असलेल्या ऐतिहासिक अष्टभुजा देवीची पालखीही सहभागी झाली होती. त्यानंतर सावरकर वाडा येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक चारुदत दीक्षित व सहकलाकारांचे वीर सावरकर लिखित गीतांचे गायन, योगेश सोमण लिखित-दिग्दर्शित सावरकर आणि मृत्यू’ या संवादाचे बद्रीश कट्टी व आदित्य धलवार यांचे अभिवाचन आदी कार्यक्रमही संपन्न झाले तसेच यावेळी अनेक मान्यवरांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कारदेखील पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय केकाणे यांनी केले तर मृत्यूंजय कापसे यांनी आभार व्यक्त केले. जितेंद्र भावसार यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य व विचार अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यानिमित्ताने एक राष्ट्रीय विचार जागरण घडवण्याकरिता महाराष्ट्र राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने विशेष पुढाकार घेतला आहे. याच मोहिमेतून भगूर येथे झालेला हा कार्यक्रम तसेच उभारण्यात येत असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक भव्य थीम पार्क तसेच वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ आदी महत्वपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून प्रथमच राज्य सरकारतर्फे वीर सावरकर विचार जागरणासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न होत असल्याने नाशिकसह राज्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.