“आपण ‘मराठी एकत्र’ असू तर…” मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंचे विशेष पत्र

232

कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय २१ जानेवारी २०१३ मध्ये महाराष्ट्र सरकारने घेतला. मराठी भाषा दिनासाठी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा मराठी दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर पत्र शेअर करत या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरेंनी शेअर केले पत्र…

सर्वप्रथम ‘मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

कुसुमाग्रजांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाला अभिवादन म्हणून तेंव्हाच्या सरकारने, कुसुमाग्रज जयंती, २७ फेब्रुवारी, “मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला. पण नेहमीप्रमाणे सरकारी उदासीनतेत तो साजरा व्हायचा. कुठल्याही राजकीय पक्षाला देखील तो साजरा करायची इच्छा नव्हती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो सार्वजनिक स्वरूपात अत्यंत उत्साहात साजरा करायला सुरुवात केली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पहिला पक्ष पण आमचाच. हे सगळं सांगायचा उद्देश इतकाच की, आपल्या भाषेसाठी, आपल्या सणासाठी आपल्या संस्कृतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर एकही पक्ष हिरहिरीने पुढे आलेला नाही. आणि सध्या जी एकूणच राजकीय दंगल सुरु आहे, त्यात कोणी येईल अशी शक्यता वाटत नाही.

असो, त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्या लाडक्या ‘मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना, ह्या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभं रहावं लागणार आहे हे भान सोडून चालणार नाही. व्यवहारात मराठी असावी, प्रशासनात मराठी असावी इथपासून ते अगदी दूरसंचार माध्यमांमध्ये, दूरदर्शनवरील समालोचनात, अभिजात भाषेच्या दर्जासाठीही आम्ही संघर्ष केला, आणि पुढे देखील करू. पण त्यासाठी आमच्या संघर्षाला तुमची साथ हवी तरच है। शक्य आहे. मला माहिती आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनच तुमच्या सगळ्या बाबतीत अपेक्षा असतात, पण ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीचीही नितांत गरज आहे. आपण मराठी एकत्र असू तर ‘सर्वत्र मराठी करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही।

मी माझ्या विकास आराखड्यात म्हणलं आहे तसं, ‘मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपलं स्वप्न असायला हवं, हे स्वप्न वास्तवात यावं ह्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा! आपला नम्र राज ठाकरे.

अशाप्रकारे ट्विटरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्र लिहित सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.