पक्ष कार्यालयाच्या मागणी संदर्भात लेखी पत्र लिहिण्यास का वाटतेय ठाकरे गटाला भीती?

153

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला एक वेगळंच वळण मिळालं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाने काही शिवसेनेच्या कार्यालयात प्रवेश करून ताबा घेतला. यामध्ये विधिमंडळातीलही कार्यालय होते. त्यामुळे सोमवारपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधिमंडळात ठाकरे गटाला कार्यालय नसल्यामुळे वणवण करावी लागली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पक्ष कार्यालय नसल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या कार्यालयात ठाकरे गटाला कार्यालय थाटावे लागले होते. यासंदर्भात ठाकरे गटाकडून लेखी पत्र आल्यावर विचार करू, अशी ठाम भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली आहे. पण आता ठाकरे गटाला पक्ष कार्यालयासाठी लेखी पत्र देण्यास भीती वाटत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये पक्ष कार्यालय देण्याची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. पण आयोगाच्या निर्णयानंतर अधिकृत शिवसेना एकच असल्याचे सांगत राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या लेखी पत्रानंतरच पक्ष कार्यालयाचा विचार करू अशी भूमिका मांडली आहे.

यामुळे ठाकरे गटाला लेखी पत्र देण्यास वाटतेय भीती

सध्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. त्यामुळे जर यादरम्यान पक्ष कार्यालयासाठी लेखी पत्र दिले तर शिवसेनेचे आधीचे कार्यालय आमचे नाही. शिवाय शिवसेनेत फूट पडल्याचे स्पष्ट होईल. तसेच अध्यक्षांकडे ठाकरे गट एक वेगळा गट असल्याचा पुरावा जाईल, असे ठाकरे गटाचे मत आहे.

(हेही वाचा – निवडणूक अयोग नव्हे चुना लगाओ अयोग – उद्धव ठाकरे)

‘आम्ही पक्ष कार्यालयासाठी कोणतीही मागणी करणार नसून शिवसेना एकच आहे, कोणताही गट नाही. जेव्हा यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल तेव्हाच योग्य न्याय मिळेल,’ अशी भूमिका आमदार अनिल परब यांनी मांडली आहे. त्यामुळे सध्या ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर लक्ष ठेऊन असून वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. कारण पक्ष कार्यालयासाठी जर लेखी पत्र लिहिले तर वेगळा गटाचा पुरावा जाण्याची भीती ठाकरे गटामध्ये आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.