महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार मुंबईतील नद्या, तलाव आणि खाडी आदींमध्ये बिनपावसाळी अंतर्गत प्रवाह सांडपाणी तथा विना प्रक्रिया मलप्रवाह किंवा अर्धवट प्रक्रिया केलेला मलप्रवाह रोखण्यासाठी प्रतिबंधकात्मक उपाय योजना महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत आहे. त्यानुसार शीव तलाव, कुर्ला येथील शितल तलाव आणि कांदिवलीतील डिगेश्वर तलावातील पाणी हे डीबीओ आधारावर मोबाईल ट्रिटमेंट युनिट वापरुन शुध्द केले जाणार आहे.
( हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अखेर तोडगा! मुख्यमंत्र्यांनी पगाराबाबत केली मोठी घोषणा)
मुंबई शहरातील शीव तलाव, पूर्व उपनगरातील शितल तलाव आणि पश्चिम उपनगरातील डिंगेश्वर तलावातील प्रवाहित होणारे बिन पावसाळी अंतर्गत प्रवाह दुसरीकडे वळविण्याविषयी प्रायोगिक तत्वावर अभ्यास करून प्रदुषण थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यासाठी नेमणूक केलेल्या टंडन अर्बन सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी केलेल्या अहवलानुसार या संबंधित तीन तलावांमध्ये होणारे प्रदुषण थांबवण्यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये इंदरदिप कन्स्ट्रक्शन कंपनी ही पात्र ठरली असून या कंपनीने महापालिकेने केलेल्या अंदाजित दरापेक्षा सुमारे ५२ टक्के अधिक बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, विद्युत बिलाचा भार महापालिकेने स्वत:वर घेण्याचे आश्वासन संबंधित पात्र कंपनीला करून दिल्यानंतर संबंधित कंपनीने ६३ कोटी ०७ लाख रुपयांमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली. ही कंपनी स्वेझ वॉटर टेक्नॉलॉजीस अँड सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबत डिबीओ आधारावर मोबाईल ट्रिटमेंट युनिट वापरुन या तिन्ही तलावांमधील प्रदुषित पाणी शुध्द करण्याची प्रक्रिया राबवणार आहे.
त्यामुळे या तिन्ही तलावांमध्ये या प्रकल्पाकरता ४८.१४ कोटी रुपये खर्च होणार असून पुढील सात वर्षांसाठी १६.७८ कोटी रुपये एवढा देखभाल खर्च अशाप्रकारे एकूण ६४.९२ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. पावसाळा वगळून १२ महिन्यांमध्ये या तिन्ही तलावांमधील पाणी शुध्द केले जाणर असून पुढेही या तलावातील पाणी शुध्द रहावे म्हणून संबंधित कंपनीकडेच सात वर्षांकरता देखभालीची जबाबदारी दिल्याची माहिती पर्जन्य जलवाहिनी विभागाने दिली आहे.
Join Our WhatsApp Community