केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या कार्यालयाचा ताबा घेतला. तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या प्रतोदला व्हीप जारी करण्याचा आदेश दिला, ज्यामुळे ठाकरे गटाची कोंडी झाली. आता शिवसेनेकडून संसदीय गटाच्या नेतेपदासाठी गजानन कीर्तीकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे संजय राऊत यांना हा धक्का मानला जात आहे.
संसदेच्या समितीला दिले पत्र
शिवसेनेच्या संसदीय गटाच्या नेतेपदावरून उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांच्याऐवजी लोकसभा खासदार गजानन किर्तीकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ठाकरे गटाच्या खासदारांना शिंदे गटाचा व्हीप मानवा लागणार संसदीय पक्षाच्या गटनेतेपदावरुन संजय राऊत यांना हटवण्यासाठी शिंदे गटाने प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांच्या ऐवजी गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र संसदेच्या संबंधित समितीला दिले असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. लोकसभेत शिंदे गटाकडे १३ खासदार आहेत. तर, ५ खासदार ठाकरे यांच्या बाजूने आहेत. राज्यसभेतील तिन्ही खासदार ठाकरे गटाकडे आहेत. यामध्ये संजय राऊत, अनिल देसाई आणि प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. आता, संसदीय नेता बदलल्यास ठाकरे गटाच्या खासदारांना शिंदे गटाचा व्हीप मानवा लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
Join Our WhatsApp Community