महापालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय हे ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्यात आले. त्यानंतर ते वाढवून ६२ वर्षे करण्यात आले. आता पुन्हा हे निवृत्तीचे वय ६४ वर्षे करण्यात आले आहे. एप्रिल २०२१ मध्ये अशाप्रकारे डॉक्टरांच्या सेवा निवृत्तीचे वय ६५ करण्याचा प्रयत्न तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या कारकिर्दीत झाला होता. पण हा प्रस्ताव तत्कालीन सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि तत्कालीन आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी फेटाळून लावला होता. परंतु आता प्रशासक राजवट आल्याने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मंजूर करत देत डॉक्टरांचा सेवा कालावधी दोन वर्षांनी वाढवत कनिष्ठ डॉक्टरांच्या पदोनत्तीत मोठा अडथळा निर्माण केला.
रुग्णालयातील प्राध्यापक डॉक्टरांनी पुन्हा एकदा सेवा निवृत्तीचे वय वाढवून घेण्यात यश मिळवले आहे. महानगरपालिकेतील वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, अधिष्ठाता व संचालकांचे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबतचा निर्णय प्रशासकांनी घेतला असून हे वय ६२ वरून ६४ करण्यास प्रशासकांनी स्थायी समिती आणि महापालिका यांची मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सामान्य विभागाच्यावतीने परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
या परिपत्रकात असे म्हटले की, वैद्यकीय, दंत व आयुर्वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक अधिष्ठाता, सहसंचालक व संचालक यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षांवरुन ६४ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य शासनाच्या धर्तीवर अध्यापकांचे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात आले आहे. वैद्यकीय अर्हताधारक अध्यापकांव्यतिरिक्त इतर अध्यापकांना म्हणजेच फिजीकल इंस्ट्रक्टर वा तत्सम अध्यापकांना हा निर्णय लागू राहणार नाही, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
हे आदेश महापालिकेच्या ठरावाच्या मंजुरी दिनांकापासून म्हणजेच २८ फेब्रुवारी २०२३ पासून अंमलात येतील. त्यामुळे सर्व वैद्यकीय महाविद्यालये व खाते प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांनी या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे निर्देश दिले आहेत.
( हेही वाचा: हॉक्स कॉलरच्या निशाण्यावर उद्योगपती आणि बॉलिवूड सुपरस्टार )
एप्रिल २०२१ मध्ये जेव्हा डॉक्टरांच्या सेवा निवृत्तीचे वय वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा तत्कालीन आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी डॉक्टरांचे वय वाढवून दिल्यामुळे जे कनिष्ट डॉक्टर असतात. त्यांच्यावर अन्याय होतो. त्यामुळे डॉक्टरांचे निवृत्ती वय वाढवून देण्यास आमचा विरोधच आहे, असे म्हटले होते. पण कोविडचा काळ लक्षात घेता त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामुळे त्यांना वय वाढवून द्यावे. पण त्यांना त्या पदावर न ठेवता सल्लागार प्राध्यापक पदावर ठेवले जावे. सध्या प्राध्यापक डॉक्टरांची कमतरता आहे. तिथे त्यांना सल्लागार म्हणून नेमून त्या साखळीतील तर कनिष्ठ डॉक्टरांना बढती देत त्या पदावर बसवले जावे. ज्यामुळे डॉक्टरांमधील समतोल राखला जाईल व काम करण्याची उमेदही वाढेल,असे म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात २०२१ ला जी भूमिका चहल यांची होती, ती भूमिका २०२३ ला पूर्ण बदलली.
Join Our WhatsApp Community