कोविड जम्बो सेंटर कथित घोटाळा प्रकरणी दोघांना अटक

162
मुंबईतील कोविड जम्बो सेंटर कथित घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने राजू नंदकुमार साळुंके उर्फ ​​राजीव आणि बाळा रामचंद्र कदम उर्फ ​​सुनील या दोघांना मंगळवारी अटक केली आहे. तपासा दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागलेल्या पुराव्यावरून या दोघांना मंगळवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. चौकशी दरम्यान समाधान कारण उत्तरे न देता उडवा उडवीची देत असल्यामुळे अखेर या दोघांना अटक करण्यात आली आहे.
महामारीच्या काळात मुंबईत कोविड जंबो केंद्रे स्थापन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या करार कंपनीला मंजूर करणे आणि देयके देण्याच्या कथित फसवणुकी प्रकरणी या दोघांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्यावर ३८ कोटींचे नुकसान केल्याचा आरोप असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणारे  सुजित पाटकर हे या प्रकरणातील एक आरोपी आहेत. राजू नंदकुमार साळुंके उर्फ ​​राजीव (४८) आणि बाळा रामचंद्र कदम उर्फ ​​सुनील (५८) या गुन्ह्यातील कथित आरोपी असल्याचे
आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी म्हटले आहे. या दोघांनी मध्यस्थ म्हणून काम केले आहे.
त्यांच्या बँक खात्यातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांसंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्याकडे चौकशी केली, परंतु त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. साळुंखे यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर कदम याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले. ऑगस्ट २०२२ मध्ये, भारतीय जनता पक्ष (भाजप) नेते किरीट सोमय्या यांनी सुजित मुकुंद पाटकर यांच्यासह लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या चार भागीदारांविरुद्ध तक्रार दाखल केली होती, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, संजय मदनलाल शहा आणि राजू नंदकुमार साळुंखे यांचा समावेश आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये, या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला होता.
संबंधित कंपनीला  आरोग्य किंवा वैद्यकीय सेवा पुरविण्याचा कोणताही अनुभव नसतानाही हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी तक्रारीत केला होता. या कपनीने भागीदारी करारासह बनावट कागदपत्रांच्या आधारे करार मिळाला होता असेही आरोपात म्हटले होते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी कंपनीला काळ्या यादीत टाकल्याचा आरोपही त्यांनी केला, परंतु कम्पनीने  ही वस्तुस्थिती मुंबई महानगर पालिकेपासून लपवून ठेवली आणि जंबो सेंटरमध्ये सेवा देण्याचे कंत्राट मिळवण्यात यश मिळविले.
भाजप नेत्याने यापूर्वी आरोप केला होता की दहिसर येथे १०० खाटांच्या जंबो सुविधेसाठी प्री-बिड बैठक २५ जून २०२० रोजी बोलावण्यात आली होती आणि जंबो सुविधेसाठी २७ जून रोजी स्वारस्य व्यक्त करण्यात आले होते. लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसची स्थापना करण्यात आली होती.  फक्त २६ जून रोजी अशा प्रकारे, भागीदारी फर्म अस्तित्वात येण्यापूर्वीच, आरोपींनी बोलीपूर्व बैठकीला हजेरी लावली आणि दहिसर येथे कोविड आयसीयू बेडच्या ऑपरेशन आणि व्यवस्थापनाचे कंत्राट मिळवले आणि त्यांना सात दिवसांच्या आत मनुष्यबळ एकत्रित करण्याची विनंती करण्यात आली,” सोमय्या यांनी तक्रारीत असे म्हटले आहे.  आर्थिक गुन्हे शाखेने या वर्षी जानेवारीमध्ये महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना नोटिसा पाठवल्या होत्या ज्यामध्ये मनपा द्वारे मुंबईत कोविड जंबो सेंटर्स उभारण्यासाठी करार मंजूरी आणि देयके संबंधित तपशील मागितला होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.