मागील आठवडाभरापासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या विषयावर सुनावणी सुरु आहे. शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे, असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. त्याला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयात ठाकरे गटाची बाजू कपिल सिब्बल अत्यंत अभ्यासपूर्ण मांडत आहेत. ज्यामुळे ५ सदस्यीय खंडपीठाची अडचण निर्माण झाली, त्यामुळे निर्णय कुणाच्या बाजूने लागेल असे संभ्रमित वातावरण निर्माण झाले असतानाच शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ‘उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीच्या प्रस्तावाला सामोरे न जाता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला म्हणून सरकार कोसळले’, हा मुद्दा मांडला. न्यायालयानेही हाच मुद्दा उचलून धरला आहे. ज्यामुळे शिंदे गटाची बाजू भक्कम झाल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे इतका चुकीचा निर्णय घेण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना कुणी दिला होता, यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
वास्तविक पाहता जेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांनी त्याची घोषणा फेसबुक लाईव्हवरून करून सर्वसामान्यांना याची माहिती दिली, त्यानंतर तेव्हाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सोपवला. मात्र त्यावेळी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. स्वतः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे, त्यांनी बहुमत प्रस्तावाला सामोरे जाणे अपेक्षित होते, असे म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडी सरकारचे जनक शरद पवार यांनीही त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेताना आम्हाला सांगितले नाही, असे म्हटले होते.
शरद पवार निर्णयाविषयी अनभिज्ञ?
आज जेव्हा तोच विषय सर्वोच्च न्यायालयात कळीचा मुद्दा बनला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या कृतीने शिंदे गटाचे कायद्याच्या दृष्टीने पारडे जड झाल्याचे दिसत आहे, अशा वेळी अनेक नेते मंडळी त्यावेळीच्या घटनाक्रमावर मतप्रदर्शन करताना दिसत आहेत. ज्यामध्ये अजित पवार यांची प्रतिक्रिया विशेष लक्षणीय आहे. अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना, उद्धव ठाकरे यांनी ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत, याची पूर्व कल्पना आम्हाला दिली होती, असे सांगितले. त्यामुळे शरद पवारांची उपरोक्त प्रतिक्रिया भुवया उंचावणारी वाटत आहे. जर उद्धव ठाकरे हे अजित पवार यांना त्यांचा निर्णय सांगतात, तो निर्णय त्यांनी शरद पवार यांना सांगितला नसेल, यावर कुणाचा विश्वास बसणार? मुळात महाविकास आघाडी सरकारचे जनक म्हणून शरद पवारांना विचारूनच सर्व महत्वाचे निर्णय होत होते, ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले, त्या पवारांना सरकार कोसळणारा निर्णय माहित नव्हता, असे होणे शक्यच नाही. मग शरद पवारांना या निर्णयाचे परिणाम लक्षात आले नव्हते का, जे पृथ्वीराज चव्हाण यांना लक्षात आले होते की शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाला मूकसंमती दिली? की उद्धव ठाकरे यांना हा निर्णय घेण्याचा सल्ला देणारे ते स्वतः सल्लागार होते? याचे उत्तर केवळ उद्धव ठाकरे आणि शरद पवारच देऊ शकतात.
भावनिक सल्ला देणारे संजय राऊत?
दुसरे गोष्ट म्हणजे त्या काळात उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटचे सहकारी म्हणून संजय राऊत नावारूपाला आले होते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राऊत चक्क दुवा बनले होते. त्या अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे हे संजय राऊत ह्यांनाच विचारून महत्वाचे निर्णय घेत होते. शिवसेनेत उभी फूट पडली आहे, आता शिवसैनिक हीच शक्ती आहे, शिवसैनिकांना राखून ठेवण्यासाठी आपण थेट मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ आणि आपल्याला पदाची लालसा नव्हती असा संदेश देऊ, असा सल्ला संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता का? याचीही शक्यता नाकारता येत नाही, असेही राजकीय विश्लेषक म्हणतात. त्यामुळे यामागील सत्यताही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनाच माहित आहे.
Join Our WhatsApp Community