महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील गुरूवारची सुनावणी केवळ दोन तासांमध्ये संपली असून यावरील पुढील सुनावणी १४ मार्चला घेण्यात येणार आहे. त्यामुळे १४ मार्चला शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
( हेही वाचा : Emergency Landing: बांगलादेशहून मस्कतला जाणाऱ्या ओमान विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग)
एकनाथ शिंदे गटाकडून अॅड. नीरज कौल यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला असून त्यानंतर अॅड. हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली परंतु काही कारणास्तव त्यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकलेला नाही. याप्रकरणाची पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे.
हरीश साळवे यांचा युक्तिवाद
- राजकीय नैतिकता टिकून रहावी म्हणून सिब्बल यांनी मागणी केली यावर मी प्रथम युक्तिवाद करणार आहे असे हरीश साळवे म्हणाले.
- उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजनीमा दिला त्यानंतर राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले परंतु उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेलेच नाहीत.
- उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला गेले असते तर शिंदे गटाने काय भूमिका घेतली असती हे आपण सांगू शकत नाही. जेव्हा एकनाथ शिंदे बहुमत चाचणीला सामोरे गेले तेव्हा ठाकरेंचे समर्थक असलेले १३ आमदार गैरहजर राहिले.
- बहुमत चाचणी झाली तेव्हा आमदारांवर अपात्रतेची कारवाई झालेली नव्हती त्यामुळे त्यांनी केलेले मतदान चुकीचे ठरत नाही.
गुरूवारच्या सुनावणीमधील एकनाथ शिंदेंचे वकील नीरज कौल यांच्या युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे…
- राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले याच चुकीचे काय आहे. एकनाथ शिंदे यांनी बहुमताचा दावा केल्यावर राज्यपालांनी दोन दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे.
- विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष यांच्यात कृत्रिम भेद करण्याचा प्रयत्न केला जात आहे हा भेद करणे चुकीचे आहे. विधिमंडळ आणि राजकीय पक्ष एकच आहे.
- लोकशाहीमध्ये पक्षाअंतर्गत होणाऱ्या मतभेदाला सुद्धा मान्यता द्यायला हवी.
- विधिमंडळात कोणाला बहुमत आहे हे विधानसभा अध्यक्षांनी ठरवायचे आहे, मात्र ठाकरे त्यांना बायपास करून गट सर्वोच्च न्यायालयामध्ये आला आहे.
- अपात्रतेची कारवाई सुरू आहे म्हणून आमदारांचे अधिकार काढून घेता येत नाही.