बहुचर्चित चिंचवड पोट निवडणुकीचा निकाल लागला, संध्याकाळी ५ वाजता त्याठिकाणची मतदानाची अंतिम आकडेवारी आली, त्यावर भाजपच्या अश्विनी जगताप यांचा ३६ हजार ९१ मतांनी विजय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकीकडे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा पराभव सहन करावा लागला असताना चिंचवडमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपाने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे निवडणूक पार पडली. शिवाय उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्येच बंडखोरी झाल्यामुळे ही तिरंगी लढत झाल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी या निवडणुकीत बंडखोरी केली, त्यामुळे राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला.
(हेही वाचा कसब्याच्या निकालावरून फडणवीसांचा काँग्रेसला टोला; म्हणाले…)
चिंचवड येथील अंतिम आकडेवारी
- अश्विनी जगताप – १, ३५, ४३४
- नाना काटे – ९९, ३४३
- राहुल कलाटे – ४४, ०८२
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा खूप प्रयत्न झाला. पण अखेर महाविकास आघाडीने निवडणूक बिनविरोध न करता आपला उमेदवार घोषित केला. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. पण उमेदवारीसाठी आग्रही असलेले राहुल कलाटे यांची नाराजी महाविकास आघाडीने ओढवून घेतली. अखेर भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पण नाराज झालेल्या राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या होत्या.
गड राखण्यात भाजप यशस्वी
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 50.47 टक्के मतदान झालं होतं. म्हणजेच, 5 लाख 68 हजार 954 मतदारांपैकी 2 लाख 87 हजार 145 मतदारांनी मतदान केलं होतं. चिंचवडमध्ये मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप यांच्यासह सगळीकडे सध्या ज्या उमेदवाराची चर्चा सुरु होती आणि ज्या उमेदवाराने राष्ट्रवादी आणि भाजपचं टेन्शन वाढवलं होतं, अशा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिहेरी लढत पार पडली. तिघांकडूनही जोरदार प्रचार करण्यात आला होता. तिघांकडूनही प्रचारासाठी मोठमोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती. रॅली, सभा, पदयात्रा काढण्यात आल्या. पण आपला मतदार संघ ताब्यात ठेवण्यात भाजपला यश आलं आहे.
कोण आहेत अश्विनी जगताप?
अश्विनी जगताप या चिंचवड मतदारसंघाचे भाजपचे दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या मतदारसंघात भाजपकडून अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, पण फारसा फायदा झाला नाही. अखेर अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका
राष्ट्रवादीकडून नाना काटेंना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. यावरुन नाराज होत राहुल कलाटेंनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याचाच फटका चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला झाल्याचं दिसत आहे. कलाटेंच्या बंडखोरीमुळे मत विभागली गेली आणि त्याचा फायदा आपसूकच भाजपला झाल्याचं निवडणूक निकालांवरुन स्पष्ट दिसतं आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही नाना काटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार मैदानात उतरले होते. तसेच, उमेदवार नाना काटे हेही घरोघरी जाऊन प्रचार करत होते. 2017 साली पालिकेच्या सत्ता हाती घेताना भाजपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे आता जनता आमच्या बाजूने आहे, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला होता. त्यासोबतच चिंचवड विधानसभा पुन्हा काबीज करण्यासाठी विरोधीपक्ष नेते अजित पवार प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार सभा अथवा रॅली न काढता, त्यांनी घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला होता. निवडणुकीवेळी तब्बल आठवडाभर अजित पवार चिंचवड विधानसभेत ठाण मांडून होते. दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी जंगजंग पछाडत असल्याचं पाहायला मिळलं होतं. भाजपकडूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी टीम मतदारसंघात तैनात केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दौराही झाला होता.
Join Our WhatsApp Community