भारतीय जनता पक्षाने नागालॅंड आणि त्रिपुरामध्ये आपली सत्ता राखली आहे. यामध्ये त्रिपुरात तर स्वतःचं बहुमताचं सरकार आलं आहे. या दोन्ही राज्यात कॉंग्रेसचं अस्तित्व देखील संपलेलं आहे. चिंचवडमध्ये देखील भाजपला घवघवीत यश मिळालं. कसब्यात मात्र भाजपचा पराभव झाला. कसब्यातील निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठेची निवडणूक बनवली होती. स्वतः गिरीश महाजन या ठिकाणी ठाण मांडून बसले होते. महाजनांना संकटमोचक मानलं जातं. पण यावेळी त्यांची जादू का चालली नाही? भारतीय जनता पक्षासारख्या लोकशाही पद्धतीने चालणार्या पक्षात काही गोष्टींकडे वरिष्ठांचं लक्ष अवश्य जायला हवं. विशेषतः नगरसेवक, आमदार व खासदार झालेली मंडळी कशाप्रकारे काम करतात यावर लक्ष असायला हवं. त्याचबरोबर पदाधिकारी म्हणून वावरणारे, पदाचा उपभोग घेणारे त्या पदासाठी खरोखर योग्य आहेत का? व त्या पदानुसार कार्य करत आहेत का? हा प्रश्न पडायला हवा. कसब्यातील पराभव इतर ठिकाणच्या विजयापेक्षा अगदी लहान असला तरी भाजपची हक्काची जागा गेली एवढं मात्र खरं. २०१४ साली भारतीय जनता पक्षाला नरेंद्र मोदिंनी सर्वोच्च यश मिळवून दिलं. मात्र त्यानंतर ठिकठिकाणी स्थानिक नेत्यांनी आपापल्या विभागात जनतेपर्यंत पोहोचायला हवं. तसं घडताना दिसत नाही. केंद्रात मोदी निवडून आणू शकतात आणि राज्यात फडणवीसांची जादू चालेल यावर किती काळ तरणार आहेत? देवेंद्र फडणवीसांना २०२४ ची तयारी करायची आहे. त्यासाठी त्यांना उत्कृष्ट स्थानिक नेत्यांची फळी हवी आहे. तसेच भाजपनेही आपले निष्ठावान कोण आहेत हे देखील ओळखणं गरजेचं आहे आणि कोण केवळ मलई खातोय व आयत्या बिळावर कोण नागोबा आहे, हे देखील ओळखायला हवं. जरी चिंचवडसह इतर राज्यात भाजपचा मोठा विजय झाला असला तरी कसब्यातील पराभव हा आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.
Join Our WhatsApp Community