आधी फक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी एवढीच घोषणा होती. मात्र, आमची घोषणा एवढी मर्यादित आणि संकुचित नाही. आमची घोषणा आहे माझा महाराष्ट्र आणि गतिमान महाराष्ट्र हे आमचे ब्रीद वाक्य आहे. आम्ही छोटा विचार करत नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांना उत्तर देत होते.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे
ते जाहिरातीचे जाऊ द्या, आधी फक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही एवढीच घोषणा होती. मात्र, आमचं ब्रीद वेगळं आहे. माझा महाराष्ट्र आणि गतिमान महाराष्ट्र हे आमचे ब्रीद आहे. आम्ही मर्यादित आणि संकुचित विचार करत नाही, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
कायदा सुव्यवस्थेवरुन राज्यात काय परिस्थिती होती तुम्हाला माहिती आहे. गृहविभाग कसे काम करत होता उद्धव ठाकरेंच्या काळात? हे सगळ्यांना माहित आहे. त्यावेळीही आपण पाहिले की काम कसे चालत होते.
साधू हत्याकांड झाले, लष्कराच्या माजी अधिका-याला मारहाण झाली, जळित कांड झालं, संभाजीनगरची दुर्दैवी घटना घडली, मुंबईतल्या साकीनाका भागात दुर्दैवी घटना घडली, शर्जील उस्मान, मनसुख हिरेन कितीतरी प्रकरणे राज्यात उद्धव ठाकरेंच्या काळात घडली.
( हेही वाचा: अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर: मानधनात होणार २० टक्क्यांची वाढ )
आम्ही सुडभावनेने वागत नाहीत
आता गुन्ह्यांची नोंद घेतली जात आहे. गुन्ह्यांचा तपास केला जात आहे. गुन्हेगारांना आळा घालण्याचे काम सरकार करत आहे. हुनमान चालिसावरुन रवी राणा आणि त्यांच्या पत्नीला तुरुंगात धाडले. कंगनाचे घर तोडले. गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचे षड्यंत्र रचले गेले. आता आम्ही असे काहीही वागत नाहीत, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले.
Join Our WhatsApp Community