मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर प्रचंड प्रमाणात गर्दी असते. वाढलेल्या लोकसंख्येसाठी आता ठाणे स्टेशन अपुरे पडत असल्याने न्यायालयाने ठाणे येथील मनोरुग्णालयाच्या 72 एकर जागेपैकी 14.83 एकर जागा नव्या रेल्वे स्टेशनच्या बांधणीसाठी ठाणे महापालिकेला हस्तांतरित करण्याचा आदेश जिल्हाधिका-यांना दिला आहे.
रेल्वे प्रशासनाने नवे स्टेशन उभारण्यास मंजुरी दिली आहे. तसेच, अभियंत्यांनी 2018 मध्ये आराखडाही तयार केला आहे. त्याशिवाय मनोरुग्णालयाच्या पुनर्बांधणी व नूतनीकरणाचा मास्टर प्लॅनही तयार आहे. या रेल्वे स्टेशनमुळे मनोरुग्णालयाचा कोणताही भाग पाडण्यात येणार नाही. रुग्णांना रेल्वेच्या आवाजाने त्रास होणार नाही, यासाठी साउंड बॅरिअर लावण्यात येतील. ठाण्याची वाढलेली लोकसंख्या पाहता, याठिकाणी नवे स्टेशन उभारण्याची अत्यावश्यकता आहे आणि हे काम तातडीने करावे लागेल, अशी माहिती राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला दिली.
( हेही वाचा: ५ मार्चला लोकलच्या कोणत्या स्थानकांदरम्यान असणार मेगाब्लॉक? पहा संपूर्ण वेळापत्रक )
मुलुंड- ठाणेदरम्यान स्टेशन
- नव्या स्टेशनच्या बांधणीसाठी 289 कोटी रुपये खर्च येणार
- स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेने चार लाख ठाणेकरांचे सर्वेक्षण केले. त्यापैकी बहुतांश लोकांनी ठाणे स्टेशनचा विस्तार करण्याची किंवा नवीन स्टेशन उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
- ठाण्याची सध्याची लोकसंख्या 26 लाख 50 हजार
- ठाणे स्टेशनमधून दररोज 7 लाख प्रवाशी प्रवास करतात
- नव्या स्टेशनचा फायदा नौपाडा, वागळे इस्टेट, किसन नगर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना होणार