साडेतीन शक्तीपीठांपैकी एक सप्तशृंगी देवीच्या मंदिरात चोरांनी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला. नाशिकच्या वणी येथील या मंदिरात हा प्रकार घडला. त्यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या चुना फासला होता. येथील दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या अनेक नोटा जळालेल्या आढळून आल्या.
१३ फेब्रुवारी रोजी ही चोरीची घटना घडली होती. ही घटना घडून जवळपास २० दिवस उलटल्यानंतर हा चोरीचा प्रकार समोर आला आहे. पण २० दिवस उलटूनही अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खरे तर ही गोष्ट आश्चर्य व्यक्त करण्यासारखीच आहे. याबाबतीत अद्याप गुन्हा दाखल नसून विश्वस्त ऍड. दीपक पाटोदकर यांनी संस्थान अध्यक्षांना तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्र दिले आहे. सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही असतानाही ही चोरी कशी झाली? त्यामुळे गडावरील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यभरातील काही प्रमुख मंदिरांमधील सप्तशृंगी मंदिर हे एक प्रमुख मंदिर आहे.