काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या गटाची आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची युती झाली. तेव्हापासून महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा सामाविष्ट करणार का? याची चर्चा सुरू आहे. पोटनिवडणुकीमुळे ही चर्चा काही काळासाठी बंद झाली होती. पण आता या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या चर्चेबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का? असा सवाल पत्रकारांनी केला असताना शरद पवार म्हणाले की, ‘मला याबद्दल माहिती नाही. मी त्या चर्चेत नसतो. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने एकत्र निवडणूकीला सामोरे जावे ही आमची विचारधारा आहे. त्यामुळे एकत्र बसून निर्णय घेऊ. सध्या तरी मतदारसंघनिहाय आढावा घेतला नाही, त्यामुळे तो घ्यावा लागणार आहे.’
तसेच सध्या भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या तयारी लागला आहे. याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, ‘कोण तयारीत आहे, हे निवडणुकीच्या निकालातून दिसेल.’
दरम्यान हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी एकत्र येत युतीची घोषणा केली होती. दादरमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्तपणे ही घोषणा केली होती.
(हेही वाचा – काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या भावाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या)
Join Our WhatsApp Community