ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि निवडणूक आयोगावरही सडकून टीका केली. आता उद्धव ठाकरेंच्या भाषणावर सत्ताधारी नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.
‘तेच शब्द, तिच वाक्य, तेच टोमणे’
प्रसार माध्यमांसोबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘तेच शब्द, तिच वाक्य, तेच टोमणे. काहीही नवीन या सभेतून मिळालं नाही. खरं म्हणजे त्यांच्या नाकाखालून ४० लोकं निघून गेल्याचा संताप आणि निराशा, या दोन्ही गोष्टीमुळे त्यांच्या भाषणामध्ये फक्त हताशा आपल्याला पाहायला मिळत होती. या व्यतिरिक्त त्यात काही नव्हतं. त्यामुळे अशा हताश भाषणावर आणि अशा टोमण्यांवर कुठलीही प्रतिक्रिया देणं मी योग्य समजत नाही.’
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले होते?
‘आता त्यांचा रोजचा थयथयाट सुरू आहे. त्यांनी फक्त जागा बदलेली आहे. त्यांना आरोप-प्रत्यारोप केल्याशिवाय दिवस जात नाही. त्याशिवाय त्यांना चैनही पडत नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करावेत, आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ’, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होत.
(हेही वाचा – भाजप, मुख्यमंत्री शिंदे आणि निवडणूक आयोगावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; खेडमधील सभेतून जनतेला भावनिक हाक)
Join Our WhatsApp Community