विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्यामुळे खासदार संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेला हक्कभंग प्रस्ताव राज्यसभा विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी एक पाऊल मागे घेत भूमिका स्पष्ट करण्यासाठी आठ दिवसांची वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संजय राऊत यांनी यासंदर्भात विधिमंडळ सचिवांना पत्र लिहिले आहे. ”सभागृहाचा अवमान करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. मी केलेले वक्तव्य हे विधिमंडळातील एका गटासाठी होते. त्यामुळे भूमिका स्पष्ट करण्यासाठी मला एका आठवड्याची मुदत देण्यात यावी”, असे राऊत यांनी पत्रात नमूद केल्याचे कळते.
विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्यामुळे राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. विधानसभा सचिवांनी १ मार्चला नोटीस जारी करत त्यांना ४८ तासांची मुदत दिली होती. ही मुदत उलटून जवळपास पाच दिवस लोटले, तरी राऊतांनी हक्कभंग नोटिशीवर लेखी खुलासा पाठविलेला नव्हता. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून हे प्रकरण विशेष अधिकार समितीकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
त्यानंतर विधानसभा विशेषाधिकार समिती संबंधित प्रकरण राज्यसभेच्या विशेष अधिकार समितीकडे पाठवणार होती. असे झाल्यास भविष्यात अडचणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राऊतांनी तलवार म्यान केल्याचे कळते.
Join Our WhatsApp Community