शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन गुरुवारी विधानसभेत विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतला. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी सरकारला चांगलेच घेरले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतापले आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अवकाळीग्रस्त भागाचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
नक्की काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘जसे अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे नुकसान झाले, त्याबाबतीत तातडीने पंचनामे झाले पाहिजे, असे म्हणाला होता. मी तातडीने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले, युद्धपातळीवर त्याचे पंचनामे करा आणि त्याची माहिती पाठवा. पंचनामाचे काम काही प्रमाणात झाले आहे आणि काही प्रमाणात सुरू आहे. जी तुमची भावना आहे, तिच सरकारची भावना आहे. आपण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार आहे का? सोडलय का? तुम्ही ऐकणार आहेत की फक्त राजकारण करणार आहात? आपल्याला शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका जशी तुमची आहे, तशी सरकारची आहे.’
‘आपल्याला मदत करायची आहे की फक्त सभागृहात गोंधळ घालायचा आहे याचा विचार करा’
पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘यापूर्वी आपण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली, आपण नियम, निकष पाळले का? नियमावर बोट ठेवले का? आता जी नुकसान भरपाई दिली, एनडीआरएफच्या दुप्पट दिली, २ हेक्टरचे ३ हेक्टर केले. आता जे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे येतायत. जेव्हा पंचनामे पूर्ण होतील, तेव्हा तात्काळ त्यांना मदत दिली जाईल. जशी आपण पूर्वी मदत दिली तशी मदत आपण त्यांना देणार आहोत. मदतीसाठी सरकारने हात आकडता घेतलाय का? सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. आपल्याला मदत करायची आहे की फक्त सभागृहात गोंधळ घालायचा आहे याचा विचार करा. राजकारण करायची गरज नाही. शेतकऱ्यांच्या मागे सरकार विरोधी पक्षाने एकत्र येऊन उभे राहणे गरजेचे आहे.’
अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी
‘मी, काल, परवाही बोललो आहे की, नाफेडची खरेदी सुरू झालेली आहे. मी सगळीकडे म्हणत नाहीये. काही ठिकाणी नाफेडची खरेदी सुरू झालेली आहे. त्याच बरोबर कांदा उत्पादकाला दिलासा देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. १२ हजार कोटी रुपये दिले. तुमच्यासारखे फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसली नाहीत. अरे ५० हजार रुपये देतो बोलून दिले का? ५० हजार रुपये नियमित कर्जफेट करणाऱ्या शेतकऱ्यांचा निर्णय घेतला तर दिले का? आम्ही दिले. कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील सरकार न्याय देईल, क्विंटलमागे जी आपल्याला मदत करायची आहे, ते देखील सरकार करेल. शेतकऱ्यांच्या मागे सरकार खंबीरपणे उभा राहिल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी झाली.
(हेही वाचा – शेतक-यांच्या प्रश्नावरुन विरोधकांचा सभात्याग)
Join Our WhatsApp Community