मोकळ्या जागांच्या हरित क्षेत्रांबाबतच्या मार्गदर्शक तत्वांची पुस्तिका येत्या सहा महिन्यांत

223

मुंबई महानगरात प्रत्येक घरापासून ते प्रत्येक मोकळ्या सार्वजनिक जागेपर्यंत सर्वत्र हरित आच्छादन व हरित क्षेत्र वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग लाभावा, याकरीता उद्यान विभागाच्या वतीने मार्गदर्शक तत्त्वांची पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने विचारविनिमय करण्यासाठी महानगरपालिकेचा उद्यान विभाग, संबंधित भागधारक आणि विषय तज्ज्ञांच्या उपस्थितीत बुधवारी चर्चासत्र संपन्न झाले. सर्व संबंधितांची मते, अभिप्राय, सूचना, विचार संकलित करुन, त्यास अंतिम रुप देवून येत्या सहा महिन्यांच्या आत ही पुस्तिका प्रकाशित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

( हेही वाचा : दादर पश्चिम फेरीवाला : महापालिका आणि पोलीस अॅक्शन मोडमध्ये, पदपथांवरील अनधिकृत स्टॉल्ससह दुकानांच्या बाहेरील वाढीव प्रदर्शनी भागही तोडले )

महानगरपालिकेचा उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणाने वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया (डब्ल्यूआरआय इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने, भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान येथे मुंबईतील विविध संस्थांसोबत या विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विविध विभागांचे अधिकारी, हरित तज्ज्ञ, वास्तु तज्ज्ञ, विकासक संघटना, आरेखक (डिझायनर), कॉर्पोरेट्स, देणगीदार, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचे प्रतिनिधी या चर्चासत्राला उपस्थित होते.

दरवर्षी पावसाळापूर्व कालावधीत नागरिक तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील संस्था सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी – सीएसआर) अंतर्गत वृक्षलागवडीचे उपक्रम राबवतात. अशा प्रयत्नांना शास्त्रोक्त पद्धतीची जोड मिळणे आवश्यक आहे. तसेच त्यामध्ये वैज्ञानिक दृष्ट्या हरितीकरण तत्त्वांचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शनाची अनेकांना गरज भासते. त्यादिशेने विचार करता, महानगरपालिकेच्या मदतीने हरित आच्छादन आणि जैवविविधता वाढविण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, याचा शोध घेणे, हा या बैठकीचा उद्देश होता.

हरितीकरण वाढविण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याची गरज लक्षात घेता, मुंबईतील हरितीकरणाच्या पद्धती कशा प्रकारे अद्ययावत करता येतील, त्यामध्ये नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून लोकसहभाग कसा वाढवता येईल, अधिकाधिक शास्त्रोक्त बाबी सहजसोप्या रितीने नागरिकांपर्यंत कशा पोहोचवता येतील, इत्यादी पैलुंचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला.

महानगरातील वृक्षसंवर्धनासाठी ‘वृक्ष दत्तक’ उपक्रमाचा शोध

उभ्या मांडणीची उद्याने (व्हर्टिकल गार्डन ऍण्ड ग्रीनिंग), गच्चीवरील उद्याने (टेरेस गार्डनिंग) आणि इमारतीच्या भूखंडावर योग्य तेथे हरितीकरण करताना योग्य नियमावली असली पाहिजे, असे मत या बैठकीत सहभागी अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच हरितीकरण करताना स्थानिक व देशी प्रजातींना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने त्यांची उपलब्धतता, संसाधने यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी विनंती देखील विविध मान्यवरांनी केली.

“मुंबई महानगरासाठी प्रत्येक परिसरामध्ये हरित क्षेत्र संवर्धनाचे लक्ष्य निश्चित केले असून ते लक्ष्य गाठण्यासाठी विशेष संकल्पना, नावीण्यपूर्ण उपक्रम, सहजपणे राबवणे शक्य होईल अशा गोष्टींची गरज आहे. त्यामुळे हरित क्षेत्राशी सर्व भागधारकांना एकत्र आणून, त्यांच्यामध्ये चर्चा घडवून मुंबई महानगर ‘हरित शहर’ बनविण्याची नागरी जबाबदारी पार पाडण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले या चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करताना महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी स्पष्ट केले.

हरित क्षेत्र वाढविण्यासाठी मदतकारक ठरु शकतील अशी मार्गदर्शक तत्वे सांगतानाच मुंबई महानगरातील वृक्षारोपणाची गरज, त्याची प्रक्रिया, कायद्यातील तरतुदी या बाबींचा देखील पुस्तिकेमध्ये समावेश करण्यात येईल आणि सर्व स्तरातील मुंबईकरांना ती पुस्तिका मार्गदर्शक ठरेल, याचा प्रयत्न केला जाईल, असेही परदेशी यांनी नमूद केले. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया यांच्या सहकार्याने मुंबईत हरितीकरण शक्य असलेल्या मोकळ्या व सार्वजनिक लहानसहान जागा शोधणे, महानगरपालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावर नागरिकांना स्थानिक प्रजातीची रोपे उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्य अशा बाबी तत्काळ सुरु करण्यात येणार आहेत,” असेही त्यांनी सांगितले.

डब्ल्यूआरआय इंडियाच्या कार्यक्रम व्यवस्थापक दीप्ती तळपदे यांनी याबाबत बोलतांना “हरित क्षेत्र वाढविण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन तसेच शहरातील सर्व भागधारकांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने तीन स्तरावर विचार करता येवू शकतो. व्यक्ती स्तरावर घर, खिडक्या, बाल्कनी इत्यादी ठिकाणी हरितीकरण करता येवू शकते. मध्यम स्तरावर इमारतींच्या मोकळ्या जागा, सामुदायिक वापराच्या जागा इत्यादींचा तर मोठ्या स्तरावर मोकळे सार्वजनिक भूखंड, रस्ते, मैदाने अशा ठिकाणी हरित क्षेत्र वाढवण्याचा चालना देता येईल. त्यासाठी सर्वांना एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.