भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाचे तत्कालीन महासंचालक, सामाजिक न्याय विभागाचे माजी सचिव आणि 6 अधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांची मंजुरी न घेताच 500 कोटींच्या जाहिराती मंजूर केल्या, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मुख्य सचिवांनी केलेल्या चौकशीत हे अधिकारी दोषी आढळले आहेत. पण त्यांच्यावर कारवाई झालेली नसल्याचे अजित पवार विधानसभेत म्हणाले. शिंदे- फडणवीस सरकारच्या काळात यावर पडदा टाकला जात आहे, असा आरोपही अजित पवार यांनी केला आहे. त्यानंतर आता फेसबूक पोस्ट शेअर करत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
( हेही वाचा: जेव्हा महापालिका निवडणुका होतील, तेव्हा आपण सत्तेत असणारच; राज ठाकरेंचा विश्वास )
अजित पवारांच्या फेसबूक पोस्टमध्ये काय?
मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितील माहिती व जनसंपर्क विभागात मुख्यमंत्र्यांची मान्यता न घेता, मुख्यमंत्री महोदयांना अवगत केले असा शेरा नस्तीवर लिहून 500 कोटी रुपयांच्या जाहिराती फडणवीस सरकारच्या काळात वेगवेगळ्या विभागांनी दिल्या आहेत. हा गैरव्यवहार आहे. मान्यताच नसल्याने संबंधित जाहिरात संस्थेला द्यायची 2019-20 ची बिले वित्त विभागाने रोखून धरलेली आहेत. आता मुख्यमंत्र्यांची कार्योत्तर परवानगी घेऊन बिले अदा करण्याचे आदेश देऊन या घोटाळ्यावर पांघरुण घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत, ही गंभीर बाब आहे. या घोटाळ्यावर पांघरुण घालण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. या प्रकरणातील दोषी अधिका-यांना पाठीशी न घालता तातडीने निलंबित करावे.
Join Our WhatsApp Community