महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७व्या वर्धापनदिनानिमित्ताने पक्ष अध्यक्ष राज ठाकरेंनी गुरुवारी ठाण्यात मनसैनिकांना संबोधित केले. यावेळी आमच्या वाट्याला जायचे नाही, मुख्यमंत्रिपदावरून जावे लागले, अशी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. यालाच प्रत्युत्तर आता खासदार संजय राऊतांनी दिले आहे. मनसेच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही, असे संजय राऊत म्हणाले.
मनसेची वाढ व्यवस्थित होणे गरजेचे
शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषदेत राज ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलत असताना संजय राऊत म्हणाले की, ‘कोणी कोणाच्या वाटेला गेले नाही. त्यांच्या वाट्याला जाण्याचा इतका त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार किंवा मुख्यमंत्री पद का गेले हे अख्ख्या जगाला माहित आहे. त्यांना जर माहित नसेल तर अजून त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातले सरकार हे फक्त ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आले आणि जोडीला खोके. ईडी काय आहे हे मी आता मनसे प्रमुखांना सांगायला नको. त्यांनी त्याचा चांगला अनुभव घेतला आहे. फक्त ईडीचा अनुभव आमच्या सारख्या लोकांनी घेऊन सुद्धा आमच्या तोफा आणि आमच्या पक्षाचे कार्य सुरू आहे.’
राज ठाकरे काय म्हणाले होते?
आपल्या वाट्याला कुणी जाऊ नये. मशिदीवरील भोंग्याविरोधात जेव्हा आंदोलन झाले. तेव्हा राज्यभरात १७ हजार महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकण्यात आल्या. बोललो होतो वाट्याला जायचे नाही, मुख्यमंत्रिपदावरून जावे लागले, असे राज ठाकरे म्हणाले होते.
(हेही वाचा – नाना पटोलेंविरोधातील असंतोष पुन्हा उफाळला; असंतुष्ट गट दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला)
Join Our WhatsApp Community