एकीकडे संजय राऊत यांच्या विरोधातील हक्कभंगाचे प्रकरण प्रलंबित असताना, आता ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्यांविरोधात हक्कभंगाची सूचना दाखल केली आहे. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात दाखल झालेली ही पाचवी हक्कभंगाची सूचना आहे.
( हेही वाचा : राज्यशासन विद्यार्थिनींसाठी १ रुपयात ८ सॅनिटरी पॅड देणार!)
माजी मंत्री, आमदार अनिल परब यांनी वांद्रे येथील म्हाडाच्या इमारतीत अनधिकृत बांधकाम करीत त्यात कार्यालय थाटल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी म्हाडा आणि लोकायुक्तांकडे दाखल केली होती. यासंदर्भात म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी अनिल परब यांना नोटीस बजावली होती.
मात्र, ही जागा माझ्या नावावर नसून, इमारत क्रमांक ५७ आणि ५८ च्या नावावर आहे. या जागेशी माझा कोणताही संबंध नसताना, कोणत्याही कागदपत्रांची छाननी न करता केवळ किरीट सोमय्या यांच्या आरोपावरून मला नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे माजी मंत्री, आमदार म्हणून माझ्या विशेषाधिकाराचा भंग झाल्यामुळे किरीट सोमय्या आणि मिलिंद बोरीकर यांच्याविरोधात हक्कभंगाची सूचना दाखल करत आहे, असे अनिल परब यांनी सभागृहात सांगितले.
निर्णय राखून ठेवला
यावर, अनिल परब यांनी दाखल केलेली हक्कभंगाची सूचना मी तपासून पाहते. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. सध्या हक्कभंग समिती अस्तित्वात नसल्यामुळे हा विषय माझ्या अखत्यारीत येतो, असे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community