राजस्थानमध्ये पुलवामा हल्ल्यातील वीर पत्नींना मारहाण केल्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी थेट राज्य सरकारला सुनावले. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना खडेबोल सुनावले. राज्यसभेचे खासदार किरोडीलाल मीना पोलिसांशी झालेल्या वादात जखमी झाल्यामुळे भाजपने शुक्रवारी निषेध जाहीर केला.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भाजप खासदार किरोडीलाल मीना जात असताना ही घटना घडली. तर शुक्रवारी रात्री पोलिसांनी सचिन पायलट यांच्या जयपूर येथील निवासस्थानाबाहेरून तीन आंदोलक वीर पत्नींना उठवून त्यांच्या शहरात परत पाठवले. याशिवाय, त्यांच्या काही समर्थकांना जयपूरच्या बाहेरील बागरू येथील एसईझेड पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आले होते. राजस्थनचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट शुक्रवारी टोंक येथे होते. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर ताशेरे ओढले. सचिन पायलट म्हणाले, एखाद्याने स्वतःचा अहंकार आड येऊ देऊ नये. काही मागण्या असतील तर त्या पूर्ण करता येतील. आपण वीरांचे म्हणणे ऐकायलाही तयार नाही, हा संदेश देशात जाऊ नये. तुम्ही सहमत असाल किंवा असहमत (त्यांच्या मागण्यांशी) हे नंतरचे आहे. प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आले असते. पोलिसांनी त्याच्याशी केलेली वागणूक मान्य करता येणार नाही आणि त्याची चौकशी करून कारवाई व्हायला हवी.
(हेही वाचा पाच हक्कभंग प्रस्ताव आले; पण निर्णय घेण्यासाठी विधानपरिषदेत हक्कभंग समितीच नाही!)
तीन वीर पत्नींचा संदर्भ देत, राज्यसभा खासदार किरोडीलाल मीना यांनी ट्विट केले की, सरकार तिन्ही वीर पत्नींना इतके का घाबरते की पोलीस त्यांना रातोरात घेऊन गेले? कुठे नेले माहीत नाही. महिला केवळ मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना भेटण्यासाठी याचना करत आहेत. मुख्यमंत्री त्यांचे म्हणणे ऐकण्यास इतके का घाबरले आहेत? किरोडीलाल मीना हे एका विधवेला भेटण्यासाठी जयपूरच्या बाहेरील चोमू येथे निघाले होते. तेव्हा त्यांनी असा दावा केला होता की ते सामोद बालाजी मंदिरात जात आहे. तर पोलिसांनी सांगितले की, ते मंदिरापासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या अमरसर येथील एका विधवेला भेटायला जात होता. तेव्हा त्यांना सामोद पोलिसांनी अडवले आणि जयपूर पोलीस अधीक्षक राजीव पाचर यांच्या गाडीत ढकलले. यावरून किरोडीलाल मीना यांनी आरोप केला आङे की, पोलिसांनी माझ्याशी वाद घातला, माझे कपडे फाडले, शिवीगाळ आणि मारहाणही केली. गेहलोत सरकार लोकप्रतिनिधींशी अशाप्रकार वागत आहे. शूरवीरांच्या पाठीशी उभा राहणे इतका मोठा गुन्हा आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
Join Our WhatsApp Community