आमदार रवींद्र फाटक यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुखपदी निवड झाली. त्यानंतर शनिवार सावंतवाडी येथे शिवसैनिकांचा मेळावा झाला, येथे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. त्यावेळेस दीपक केसरकरांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ठाकरेंची शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीने विकत घेतली आहे, असा टोला यावेळी केसरकरांनी लगावला.
नक्की काय म्हणाले दीपक केसरकर?
सावंतवाडीत शिवसैनिकांच्या मेळाव्यात केसरकर म्हणाले की, ‘मी महाविकास आघाडीचा आमदार असतानाही जयंत पाटील हे सावंतवाडीत एक महिला उमेदवार घेऊन आले आणि राष्ट्रवादीच्या भावी आमदार असा प्रचार करून गेले. आपल्याच पक्षाच्या आमदारावर होणारा हा अन्याय त्यावेळी उद्धव ठाकरे यांना दिसला नव्हता का? ठाकरेंची शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीने विकत घेतली आहे.’
खरी गद्दारी ठाकरे गटानेच केली
तसेच पुढे केसरकर म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला आम्ही कोणीही सांगितले नव्हते. त्यांनी फक्त महाविकास आघाडीची साथ सोडावी, एवढीच आमची मागणी होती. मात्र, उद्धव ठाकरेंना त्यांच्या आमदार-खासदारांपेक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार जवळचे वाटले. खरी गद्दारी ठाकरे गटानेच केली आहे.’
दरम्यान या सावंतवाडीतील शिवसैनिकांच्या मेळाव्याला रवींद्र फाटक, दीपक केसरकरांसह माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी नगरसेविका अनारोजिन लोबो, भारती मोरे उपस्थित होते.
(हेही वाचा – मुश्रीफांवरील ईडी कारवाईवर संजय राऊतांचे ट्वीट; म्हणाले..)
Join Our WhatsApp Community