पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी कर्नाटकातल्या मांड्या इथे महत्वाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. लंडनमध्ये भारताच्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले जातात, हे दुर्दैवी आहे. तसेच हा देश आणि देशातील नागरिकांच्या परंपरा आणि वारशाचा अपमान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नक्की काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
‘संपूर्ण जग या लोकशाही व्यवस्थेचा अभ्यास करते आणि इतर अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी आपण असे म्हणू शकतो की, भारत केवळ सर्वात मोठी लोकशाही नाही, तर लोकशाहीची जननी देखील आहे. काही वर्षांपूर्वी भगवान बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मला लंडनला आमंत्रित करण्यात आले होते, हे माझे भाग्यच आहे. पण लंडनच्या भूमीतून भारतीय लोकशाहीवर प्रश्न उपस्थित होणे, हे दुर्दैवी आहे. भारतीय लोकशाही कमकुवत करू शकेल अशी कोणतीही शक्ती नाही. मात्र असे असतानाही भारतीय लोकशाहीवर आघात करण्याचे काही लोकांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. हे लोक भगवान बसवेश्वरांचा, कर्नाटकातील लोकांचा आणि भारतातील जनतेचा अपमान करत आहेत. कर्नाटकने अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजे,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
(हेही वाचा- इथेनॉल निर्मितीवरचा भर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सहाय्यक – पंतप्रधान मोदी)
Join Our WhatsApp Community