समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम बसवणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

114
१२ मार्चला समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचे सोमवारी विधानसभेत पडसाद उमटले. यावेळी सभागृहाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम बसविणार आहोत, अशी घोषणा केली.
आमदार संजय रायमुलकर आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याविषयी चर्चा करताना, अपघातप्रवण स्थळांवर उपायोजना करणार का? असा प्रश्‍न विचारला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम लावणार आहे, अशी घोषणा केली. तसेच महामार्गावर जिथे प्रवेश होतो, तेथेच वाहनातील प्रवाशांची पडताळणी केली जाईल. वाहनात अधिक प्रवासी असतील, तर अशा वाहनांना अडवले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, समृद्धी महामार्गावर जात असताना शिवणी गावाजवळ असलेल्या पुलावर मोठे कचके बाजूला पडलेले आहेत. वाहन जलद गतीने जात असताना ते चालकाच्या लक्षात येत नाही. वाहन पुलावर गेले की वाहनचालकाचे नियंत्रण सुटते. अशी आणखी काही अपघातप्रवण स्थळे आहेत, त्यांची चौकशी करून ते दुरुस्त करणार आहात का? या अपघातात जे मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य घोषित करणार का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.
मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर निवेदन करताना सांगितले की, या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात सकाळी ८ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास झाला. वाहनात जवळपास १३ व्यक्ती प्रवास करत होत्या. वाहनाची क्षमता ७ व्यक्तींची होती. ओव्हरस्पीड आणि चालकाचे नियंत्रण सुटणे ही अपघाताची सकृतदर्शनी कारणे दिसत आहेत. तरीही मृतांच्या नातेवाइकांना साहाय्य देण्याच्या अनुषंगाने सर्व गोष्टी पडताळून उचित कार्यवाही केली जाईल.

अपघाती ठिकाणांची माहिती मिळणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेले सूत्र गंभीर आहे. मुळात समृद्धी महामार्ग सरळ आहे. त्याला वळणे अल्प आहेत. काही जागांवर मध्यंतरी माकडांचा वावर होता. अशा जागांची माहिती गोळा केली आहे. सुधारणा चालू आहे. त्याच्यावर इंटलिजेंस ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम लावत आहोत. त्यामुळे ओव्हर स्पीड, अपघात घडेल अशा जागा सिद्ध झाल्या असतील, तर त्याची पूर्वसूचना देता येईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.