आजकाल तरुण मुले मुली मोठ्या प्रमाणावर स्टंट करताना दिसून येतात. हा स्टंट अनेकांना महागात पडतो. अशातच आता हातात पिस्तुल घेऊन हात सोडून बुलेट चालविण्याचा स्टंट करणं सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाच्या पुत्राच्या चांगलाच महागात पडला आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी नगरसेवक पुत्रासह दोघांवर सलगर वस्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
रामवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा चेतन गायकवाड आणि राजू भंडारी या दोघांवर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सलगर वस्ती पोलीस ठाण्यातील कर्मचारी सचिन शिंदे यांनी दिली आहे.
नक्की काय घडलं?
रविवारी, १२ मार्चला सोलापुरात जोरदार रंगपंचमी साजरी करण्यात आली. या दिवशी इतरांप्रमाणे चेतन गायकवाड आणि राजू भंडारी या दोघांनी काही रिल्स तयार केले होते. त्याच रिल्समुळे ते अडचणी आले. कारण या रिलमध्ये चेतन गायकवाड हात सोडून बुलेट चालवत होता आणि त्यावेळेस हातात पिस्तूल घेऊन स्टंटबाजी केली होती. मग हौशेने केलेल्या हा रिल्स दोघांच्या अंगलट आला. हा रिल व्हायरल झाल्याने पोलीस कर्मचारी सचिन शिंदे यांनी नगरसेवकपुत्राविरोधात फिर्याद नोंदवली. त्यानंतर चेतन गायकवाड आणि राजू भंडारी यांच्यावर भा. दं. वि. ५०५, २७९ व भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.