ठाकरे गटातील गळती काही थांबायचं नावचं घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या निकटवर्तीय असलेले नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. बुधवारी माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ठाकरेंची साथ का सोडली? याचं कारण सांगताना दीपक सावंत हळहळले.
काय म्हणाले दीपक सावंत?
प्रसार माध्यमांसोबत बोलताना दीपक सावंत म्हणाले की, ‘मला सामाजिक कार्यात रस आहे. त्यासाठी पाठीमागे पक्षाचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. तसंच मला काम द्या, असं साधारण वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. मात्र, त्यावर कोणतंही उत्तर आलेलं नाही. त्यामुळे काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मला खूप काही दिलं. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी मला रिटायर केलं. मला मंत्रीपद नको मला काम हवंय, यासाठी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. पण त्यावर कोणतंही उत्तर त्यांनी दिलं नाही, असं म्हणत दीपक सावंत हळहळले.
भाजप-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात दीपक सावंत आरोग्यमंत्री होते. ते विधान परिषदेचे माजी सदस्य असून ते दोन वेळेला मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून गेले होते. २००६ आणि २०१२ साली शिवसेनेच्या वतीनं दीपक सावंत विधान परिषदेवर निवडून गेले होते. पण त्यानंतर तिसऱ्यांदा त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होत.
(हेही वाचा – ठाकरेंना पुन्हा धक्का; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिवंगत आमदार गोरे कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश)
Join Our WhatsApp Community