पुन्हा मुंबईत पदपथांची खोदाखोदी : एल अँड टी खोदतेय, महापालिका बुजवतेय

158

मुंबईतील सर्व पदपथ आणि रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार करत महापालिकेने सर्व रस्ते आणि पदपथांच्या विकासाची कामे हाती घेतली आहे. परंतु आता मुंबईत सर्व विभागांमध्ये पदपथांची खोदाखोदी सुरु झालेली असून महापालिकेच्या कोणत्याही विभागाला न कळवता ही खोदाखोदी केली जात आहे. राज्य शासनाच्यावतीने मुंबईतील काही भागांमध्ये सीसी टिव्ही कॅमेरे बसवण्याची कामे हाती घेतली आहे. यासाठी खोदलेले पदपथ सुस्थितीत करण्याची जबाबदारी मात्र महापालिकेवर टाकली जात आहे. त्यामुळे या केबल्स टाकण्यासाठी एल अँड टी ही कंपनीने पदपथ खोदायचे आणि महापालिकेने ते बुजवायचे या प्रकारांमुळे अख्खी मुंबईत पुन्हा खड्ड्यात गेली आहे.

मुंबईतील काही भागांमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरांचे जाळे पसरवण्यासाठी अनेक भागांमध्ये केबल्स टाकण्याचे सुरु आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाच्यावतीने व वाहतूक पोलिस यांच्या माध्यमातून हे सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामासाठी लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला संपूर्ण मुंबईत केबल्स टाकण्यासाठी वरिष्ठ पातळीवर एक गट्टा परवानगी दिलेली असून त्यामुळे महापालिकेच्या विभाग कार्यालयामध्ये त्यांना परवानगीसाठी अर्ज करण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांना ब्लॅकेंट परमिशन दिल्याने संबंधित कंपनीच्या माध्यमातून नव्याने बनवलेल्या पदपथांवर खोदकाम करत केबल्स टाकत आहेत. मुंबईतील अनेक विभागांमध्ये अशाप्रकारे केबल्सच्या नावाखाली पदपथांचे खोदकाम सुरु असून यामुळे पदपथांवर चालताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत काही विभाग कार्यालयांशी संपर्क केला असता त्यांनी मात्र रस्ते विभागाकडूनच परवानगी दिलेली असून विभाग कार्यालयाकडे ते कधीही संपर्क करत नाही. अनेकदा तर खोदकाम केल्यानंतर ते महापालिकेच्या संबंधित विभागाला कळवतात आणि त्यानंतर याबाबतचा पाठपुरावा केल्यानंतर खोदलेले पदपथ पूर्व स्थितीत आणण्याचे काम विभाग कार्यालयालाच करावे लागत आहे,अशी माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे पदपथ किंवा रस्त्यावर खोदकाम करता महापालिकेची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे यासाठी आवश्यक शुल्क भरल्यानंतर संबंधित संस्थेला खोदकाम करण्यास परवानगी दिली जाते. त्यामुळे त्यांनी भरलेल्या शुल्काच्या रकमेतून खोदलेल्या पदपथांची सुधारणा करण्यात येते. अशाप्रकारे खोदलेले चर बुजवण्यासाठी विभाग निहाय नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून बुजवून सुस्थित पदपथ तयार केले जातात. परंतु हे कॅमेरे बसवण्यासाठी खोदकाम करताना एल अँड टी कंपनीकडून कोणतेही शुल्क स्वीकारलेले नसून उलट खोदलेले चर संबंधित कंपनीकडून बुजवून घेण्याऐवजी महापालिकेच्या निधीतून बुजवले जात आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर मोठा भडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माहिममधील मोरी रोड, सेनापती बापट मार्ग, एन.सी. केळकर मार्ग आदी ठिकाणच्या पदपथ मागील काही दिवसांपासून खोदून ठेवल्या असून याबाबत महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडे विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडेही याचे उत्तर नाही. जर शासनाने नियुक्त केलेली एल अँड टी ही कंपनी हे खोदकाम करत असेल तर तर विभाग कार्यालयाला त्याची कल्पना काही नाही ? विभाग कार्यालयातून त्यांना खोदकाम करण्यासाठी परवानगी का दिली जात नाही असा सवाल उपस्थित करत वैद्य यांनी खोदलेले चरही ते वेळेत बुजवत नाही. उलट हे चर महापालिका स्वत: बुजवत आहे. त्यामुळे शासनाच्या खर्चाचा भार महापालिकेने का वाहावा असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे जनतेला जो त्रास होत आहे याला जबाबदार कोण असा सवाल करत ज्या पदपथांची काही दिवसांपूर्वीच सुधारणा केली तेच खोदले गेल्यामुळे याचे होणारे नुकसान या कंपनीकडून वसूल केले जाणार असाही सवाल त्यांनी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.