फेब्रुवारीपासूनच महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातच तापमानाचा आकडा वाढू लागला. मुंबईला तुलनेने या उन्हाच्या झळा अधिकच तीव्रतेने जाणवल्या. पण, गेल्या काही दिवसांपासून इथेही तापमानाचे काहीसे चढ -उतार पाहायला मिळत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण, दुपारच्या वेळी तीव्र होणारा सूर्यप्रकाश आणि त्यामुळे जाणवणारा उकाडा ही सर्व परिस्थिती पाहता सध्या मुंबईकर या हवामान बदलांमुळे बेजार झाले आहेत.
मुंबईत अवकाळी हजेरी
मुंबईत गुरुवारी सकाळपासूनच काही भागात पाऊस सुरु झाला आहे. पश्चिम उपनगरात बोरिवली, दहिसर परिसरात सकाळपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. तर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ भागात पहाटेपासून पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसामुळे ऑफिसला जाणा-यांची तारांबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ हवामान आहे. मात्र, गुरुवारी सकाळपासून काही भागात पाऊस सुरु आहे. दादर-परळ परिसरात ढगाळ हवामान आहे.
वसई- विरारमध्ये मध्यरात्री पावसाच्या सरी
वसई- विरारमध्ये रात्रीपासून ढगाळ वातावरण आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी रिमझिम पाऊस पडला आहे. सध्या परिसरात पाऊस नाही, पण दिवसभरात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा: पुन्हा मुंबईत पदपथांची खोदाखोदी : एल अँड टी खोदतेय, महापालिका बुजवतेय )
जळगाव शहरासह जिल्ह्यात वादळी वा-याचा तडाखा
बुधवारी रात्री अचानक आलेल्या वादळी वा-यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वा-यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडाल्याने पादचारी आणि वाहनधारकांचे हाल होत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community