महापालिका शाळांमधील सहलीचे नियोजन फसले, पाणी आणि जेवणही पोहोचले उशिरा

252

कोविडनंतर प्रथमच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची सहल आयोजित करण्यात आली असून, बुधवारी  चौथी इयत्तेतील मुलांची सहल बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आली होती. बुधवारी गेलेल्या या सहलीच्या पहिल्याच दिवशी पाण्यासह इतर खाऊच्या वस्तू वेळेत न मिळाल्याने तहानेने आणि भूकेने व्याकूळ होण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली होती. या सहलीसाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च केले जात असून यासाठी निवड केलेल्या कंपनीला याचे योग्य नियोजन करता न आल्याने मुलांना या वस्तूंपासून वंचित राहावे लागले. विशेष म्हणजे प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, मिनरल वॉटर, विद्यार्थ्यांकरता अपघात विमा संरक्षण आदींचा समावेश असला तरी संबंधित संस्थेला हे वेळेत पुरवण्याचे नियोजन करता आले नाही. त्यामुळे शिवसेना(उध्दव ठाकरे) युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे तक्रार करून सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिवसेना (उध्दव ठाकरे) युवासेनेचे पदाधिकारी व मुंबई विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना निवेदन देऊन महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहलीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की ,मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता चौथी व इयत्ता सातवीतील जवळपास ३ हजार २०० विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त नेतृत्व गुण, वैज्ञानिक दृष्टिकोन प्रासंगिक नोंदी आदींचे विकसन होणे याकरिता मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाद्वारे ‘शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. बुधवारी एच पूर्व व एच पश्चिम विभागातील शाळांमधील मुलांची सहल गेली होती. या सहलीबाबत काही पालकांकडून प्राप्त तक्रारींनुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, मुंबई येथे गेलेल्या विद्यार्थ्यांचे पिण्याचे पाणी, खाणे यांचे अतोनात हाल झाले आहेत असे म्हटले आहे. काही विद्यार्थ्यांनी यापूर्वी अशा सहलीत सहभाग घेतला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सुविधा आणि बुधवारी १५ मार्च, २०२३ रोजी सहभागी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सुविधांमध्ये खूप फरक असल्याचे विद्यार्थी/पालकांनी तक्रारीत म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिकेत शिवसेना पक्ष सत्तेत असताना युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार प्रामुख्याने शालेय शिक्षण विभागाचा कारभार होत असे. त्यामुळे सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यांना सुविधा यावर लोकप्रतिनिधींचे लक्ष असे. परंतु यावर्षी निव्वळ पाच दिवसाच्या अवधीत या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संशयास्पद वातावरण वाटत आहे. सहलीचे आयोजन करण्याकरता देण्यात आलेले कॉन्ट्रॅक्ट सर्व प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आले आहे का? याबाबत साशंकता वाटते, तरी यामध्ये कोणाचे उखळ पांढरे करणेकरिता या सहलींचे तातडीने आयोजन करण्यात आले आहे असा संशय त्यांनी निर्माण केला आहे. त्यामुळे सर्व प्रकाराची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी आग्रही मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. ही सहल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अपेक्षित असताना केवळ दोन ठिकाणे दाखवून दुपारी दोनच्या आतच ही पिकनिक संपवण्यात आल्याची तक्रारही प्रदीप सावंत यांनी केली आहे.

New Project 2023 03 16T150601.094

( हेही वाचा: महापालिकेच्या शिक्षकांनी घेतले आदिवासी महिलांकडून हस्तकलेचे धडे )

या सहलीमध्ये इयत्ता चौथीतील ३४ हजार २६७ विद्यार्थी संख्या गृहीत धरण्यात आली आहे. या मुलांची सहल बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात  नेण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रति विद्यार्थी ५६४ रुपये खर्च करण्यास मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार चौथीतील विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी एकूण १  कोटी ९३ लाख १५ हजार रुपये खर्च केला जाणार आहे.

New Project 2023 03 16T150753.916

तर इयत्ता सातवीच्या मुलांची सहल घाटकोपर किडझानिया येथे आयोजित करण्यात आली आहे. या सातवीच्या मुलांची पटसंख्या ३२ हजार ७८८ एवढी असून माध्यमिक शाळांमधील सातवीच्या मुलांची संख्या १२७४ एवढी आहे. त्यामुळे एकूण ३४  हजार ०६२ एवढे मुले या सहलीत भाग घेतील असा अंदाज असून यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांमागे किडझानियामधील सहलीसाठी ६००रुपये खर्च केला जाणार आहे. त्यामुळे इयत्ता चौथी आणि सातवीच्या सहलीसाठी एकूण ३ कोटी ९७ लाख ५२ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. या प्रति विद्यार्थी खर्चामध्ये प्रवास खर्च, प्रवेश शुल्क,सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, मिनरल वॉटर, विद्यार्थ्यांकरता अपघात  विमा संरक्षण आदींचा समावेश संबंधित मंजूर प्रस्तावात नमुद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.