महापालिकेच्या शाळांचे विद्यार्थी स्पर्धेच्या युगातही सरस

170

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे विद्यार्थी हे स्पर्धेच्या युगात कुठेही कमी नसून अभ्यासाबरोबरच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन प्रोत्साहन देण्याची गरज आहे आणि हे कार्य महानगरपालिकेचा शिक्षण विभाग अतिशय उत्तमरित्या करीत असल्याचे गौरवोद्गार सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार यांनी काढले. ते आज महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा २०२२-२३’ चा पारितोषिक वितरण समारंभात उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज परळ परिसरातील दामोदर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या पारितोषिक वितरण समारंभाला सह आयुक्त अजित कुंभार यांच्या समवेत महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी, स्पर्धेच्या परीक्षक व सहाय्यक कला निरिक्षक महाराष्ट्र राज्य आरती श्रावस्ती, उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) सुजाता खरे व इतर अधिकारी यांची उपस्थिती लाभली. त्याचबरोबर मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक वर्ग आणि संबंधित शिक्षकवृंदही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे कला विषयक विविध उपक्रमांचे नियमितपणे आयोजन करण्यात येत असते. याच उपक्रमांच्या शृंखलेत ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’ चे आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्यातील दुस-या रविवारी करण्यात येते. यानुसार ‘महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा’ ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत विविध ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल ७७ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. तर, ३१ जानेवारी २०२३ रोजी या स्पर्धेचा निकाल एका विशेष पत्रकार परिषदेदरम्यान घोषित करण्यात आला होता.

या निकालानुसार आकर्षक, बोलकी व अर्थवाही चित्रे रेखाटणा-या ५२ परितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. यानुसार अनुक्रमे अनिकेत मंडल, सोनिया दोलूई, श्रावणी सत्यवान साटेलकर व सानिका सदाशिव पाटील, स्वरा एन. गुरव, हर्ष संदीप चव्हाण, सई धनंजय कदम, सिद्रा फरहान मोमीन, शौर्या मानकर, रागिणी चंद्रमोहन जैसवार आणि तनिष्का आर. मुणगेकर यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी (शाळा) किसन पावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कला विभाग प्राचार्य दिनकर पवार यांनी केले. तर महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांच्या स्तरावर विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना विभाग स्तरावरील कार्यक्रमांमध्ये गौरविण्यात येणार आहे, अशीही माहिती शिक्षण विभागाद्वारे कळविण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.